आंदोलनानंतरही नेत्रावतीला संगमेश्वर थांबा नाही ; कर्नाटकात दोन एक्सप्रेसना थांब्यांची खिरापत!
कोकण रेल्वे मार्गमार्गे धावणाऱ्या गरीबरथ, नेत्रावतीला कर्नाटकात थांबे; रेल्वेचा दुजाभाव
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गरीबरथ एक्सप्रेसला कर्नाटकमध्ये अंकोला तसेच नेत्रावती एक्सप्रेसला भटकळ स्थानकावर उद्या दि. ९ मार्चपासून प्रायोगिक तत्त्वावर थांबे देण्यात आले आहेत. दरम्यान, कोकण रेल्वेच्या मार्गावर मागील काही वर्षांपासून नेत्रावती तसेच मत्स्यगंधा एक्सप्रेस एक्सप्रेसच्या संगमेश्वर रोड थांब्यासाठी आंदोलन करूनही रेल्वेने थांबा मंजूर केलेला नाही. यामुळे एकाच मार्गावरील दोन राज्यांमध्ये कोकण रेल्वेचा दुजाभाव स्पष्ट झाला आहे.
कोचुवेली ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी गरीबरथ एक्सप्रेस (12202) दिनांक 9 मार्च २०२३ पासून उत्तर कर्नाटकमधील अंकोला स्थानकावर थांबणार आहे. परतीच्या प्रवासात लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान धावताना गरीबरथ एक्सप्रेस (12201) दिनांक 10 मार्चपासून अंकोला थांबा घेणार आहे.
याचबरोबर लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरमदरम्यान धावणारी नेत्रावती एक्सप्रेस (16345) दि. ९ मार्चपासून भटकळ स्थानकावर थांबा घेणार आहे. परतीच्या प्रवासात म्हणजे तिरुअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावताना नेतृत्व एक्सप्रेस (16346) दि. 9 मार्च 2023 पासून भटकळ स्थानकावर थांबा घेणार आहे. पुढील सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर थांबे असतील.
कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर रोड, संगमेश्वर तसेच खेड स्थानकावर आणखी काही एक्सप्रेस गाड्यांना थांबे द्यावेत अशी विविध संघटनांकडून वारंवार मागणी केली जात आहे. चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्यासह रेल्वे विषयक काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेले शिष्टमंडळाने बेलापूर येथील कोकण रेल्वेच्या मुख्यालयात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी संगमेश्वर तांबे संदर्भात चर्चा देखील केली. मात्र, प्रत्येक वेळी रेल्वेकडून अपेक्षित भारमान तसेच या संदर्भात रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव विचारार्थ आणि पाठवला आहे, असं सांगून यासाठी मागणी करणाऱ्यांच्या हाती धुपाटणे दिले जात आहे. या संदर्भात रेल्वेकडून होत असलेल्या दुजाभावामुळेच संगमेश्वरवासियांना सोबत घेऊन चिपळूण- संगमेश्वर निसर्गरम्य ग्रुपच्या संदेश जिमण व सहकाऱ्यांना आंदोलन करावे लागले होते. मात्र तरीही संगमेश्वर स्थानकावर नेत्रावती तसेच मत्स्यगंधा एक्सप्रेसला प्रायोगिक तत्वावर का होईना थांबा देण्याबाबत अद्याप कोणताच निर्णय घेण्यात न आल्यामुळे संगमेश्वरवासियांना वरचेवर आंदोलनाचे हत्यार उपसावे लागत आहे.
दरम्यान ज्या एक्सप्रेसला संगमेश्वर थांबा दिला जात नाही, त्याच नेत्रावती एक्सप्रेसला पुढे कर्नाटकमध्ये भटकळसारख्या छोट्या स्थानकावर थांबा देताना रेल्वेचे नियम आडवे येत नाहीत, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कर्नाटकमध्ये गरिब रथ व नेत्रावती एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांच्या थांब्यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव विचारार्थ कधी पाठवला, त्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर त्याला रेल्वे बोर्डाकडून मंजुरी कधी मिळाली हे देखील रेल्वेने स्पष्ट करावे, अशी मागणी नेत्रावती तसेच मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या थांब्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या संगमेश्वरवासी यांनी केली आहे.
एकाच मार्गावरील दोन राज्यांमधील स्थानकांवर थांबे देताना होत असलेला हा दुजाभाव लक्षात घेऊन कोकण रेल्वेशी संबंधित मागण्यासाठी झगडणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी आता ‘आरटीआय’चा आधार घेऊन ठोस माहितीसह लढा देण्याची तयारी चालवली आहे.