कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणखी सहा गाड्यांचा डिझेल इंजिनचा प्रवास संपणार!
दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस रविवारपासून विद्युत इंजिनसह धावणार
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या पॅसेंजर, एक्सप्रेस मिळून एकूण सहा रेल्वे गाड्या आठवडाभरात डिझेल ऐवजी विद्युत इंजिन जोडून धावणार आहेत. यापैकी दिवा ते सावंतवाडी दरम्यान दररोज धावणारी एक्सप्रेस गाडी (10105) रविवार दि. 12 फेब्रुवारीपासून विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे. या आठवडाभरात दि. १८ फेब्रुवारीपर्यंत आणखी पाच गाड्या विजेवर धावणार आहेत.
कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर डिझेल इंजिनसह धावणाऱ्या गाड्या विद्युत इंजिनसह चालवल्या जात आहेत. विजेवर चालवण्यासाठी आता अजून सहा गाड्या निवडण्यात आल्या आहेत.
डिझेल इंजिनच्या जागी विद्युत इंजिन जोडून चालवण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये 12223 लोकमान्य टिळक टर्मिनस ते एर्नाकुलम द्विसाप्ताहिक गाडी दिनांक 14 फेब्रुवारीपासून, एरणाकुलम ते लोकमान्य टिळक टर्मिनस (12224) दिनांक 14 फेब्रुवारीपासून, पुणे ते एरणाकुलम (22150) द्वि साप्ताहिक एक्सप्रेस गाडी दिनांक 15 फेब्रुवारीपासून, एर्नाकुलम ते पुणे (22249) दि. 17 फेब्रुवारी 2023 पासून, लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव (11099) ही आठवड्यातून चार दिवस धावणारी गाडी 18 फेब्रुवारीपासून तर 11100 ही मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान चालवली जाणारी गाडी देखील 18 फेब्रुवारीपासून विद्युत इंजिन जोडून चालवली जाणार आहे.
याचबरोबर मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मंगळूर दरम्यान रोज धावणारी (12133) ही गाडी 16 तर उलट दिशेच्या प्रवासात धावणारी मंगळूर जंक्शन ते मुंबई सीएसएमटी (12134) ही एक्सप्रेस दिनांक 17 फेब्रुवारी च्या फेरीपासून विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे.
दिवा ते सावंतवाडी दरम्यान धावणारी (10105) ही गाडी दिनांक 12 फेब्रुवारीच्या फेरीपासून तर सावंतवाडी ते दिवा दरम्यान धावणारी (10106) ही एक्सप्रेस गाडी दिनांक 13 फेब्रुवारीच्या फेरीपासून विद्युत जोडून धावेल. याच गाडीचा रेक वापरून सावंतवाडी ते मडगाव दरम्यान धावणारी दैनंदिन पॅसेंजर गाडी (50107) 12 फेब्रुवारी पासून तर मडगाव सावंतवाडी (50108) पॅसेंजर गाडी दि. 13 फेब्रुवारीपासून विजेवर धावणार आहे.
दरम्यान, कोकण रेल्वे मार्ग धावणाऱ्या बहुतांश पॅसेंजर गाड्या डिझेल ऐवजी विद्युत इंजिनसह धाऊ लागल्या आहेत. आता उरलेल्या काही प्रवासी गाड्या देखील विद्युत इंजिन उपलब्ध झाल्यानंतर विजेवर चालवल्या जाणार आहेत.