ठाणे रेल्वे स्थानकातील पंधरा वर्षांची रांगेची शिस्त रेल्वे पोलिसांनी मोडली
आरपीएफने ठाणे स्थानकातील प्रवासी संघटनेचा फलकही काढून टाकला
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातून कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाडीला ठाणे येथे गेल्या पंधरा वर्षांपासून उघडणाऱ्या विशेष डब्यात चढताना प्रवाशांची गर्दी होऊ नये यासाठी मागील पंधरा वर्षांपासून सुरू असलेली रांगेत चढण्याची शिस्त रेल्वे पोलिसांनीच मोडली आहे. या विरोधात कोकण रेल्वे प्रवासी संघ या नोंदणीकृत संघटनेने ठाण्यात सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर येताना ठाणे स्थानकावर ठराविक गाड्यांना विशेष डबा उघडला जात असे. यासाठी या संघटनेच्या वतीने गेली १५ वर्षे सातत्याने प्रवाशांना रांगेत व्यवस्थित नियोजनबद्ध सोडले जाते. मात्र, दोन दिवसांपूर्वी अचानक रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी ही रांगेची पद्धत बंद करायला सांगितली. तसेच कोणताही पूर्वसूचना न देता प्रवासी नोंद करीत असलेला संघटनेचा फलक काढून टाकण्यात आला. ठाणे रेल्वे स्थानकावरील ही पद्धत बंद केल्यामुळे याचा त्रास कोकणात जाणार्या सर्वसामान्य जनतेला होणार आहे. याचा निषेध म्हणून कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ ठाणे या रेल्वे संघटनेच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी ठाणे येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे.