नेत्रावती, मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या थांब्यासाठी उपोषणास आ. शेखर निकम यांचा पाठिंबा!
२६ जानेवारीच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सावर्डे येथे झाली बैठक
संगमेश्वर : नेत्रावती-मत्स्यगंधा या एक्स्प्रेस गाड्यांना संगमेश्वर रोड स्थानकामध्ये थांबा मिळावा, यासाठी गेली तीन वर्षे पत्रव्यवहार, आंदोलन, उपोषण असे सर्व सनदशीर मार्ग अवलंबील्यानंतर आता 26 जानेवारी 2023 रोजी आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. यासाठी होणाऱ्या आंदोलनाला चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील सर्व जनता, संघटना, ग्रामस्थ व मुंबई मंडळे, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी या सर्वांचा विनाअट पाठिंबा लाभलेल्या या आमरण उपोषणाच्या आंदोलनाची दिशा व कार्यक्रम ठरविण्यासाठी संगमेश्वर-चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या सावर्डे येथील कार्यालयात आज (दि.८ जानेवारी २०२३ ) रोजी सकाळी ९ वाजता बैठक पार पडली. सर्व प्रमुख पदाधिकारी, देवरूख व संगमेश्वर बाजार पेठेतील व्यापारी, मंडळे व त्याचे पदाधिकारी प्रामुख्याने हजर होते. चिपळूण येथील ज्येष्ठ समाजसेवक, रेल्वेविषयी परिपूर्ण माहिती असणारे तसेच कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम, सामाजिक कार्यकर्ते यूतुत्सु आर्ते, सत्यवान विचारे हे सुद्धा उपस्थित होते. त्यांनीही या उपोषणासाठी आपला पाठिंबा दर्शविला आहे.