भर उन्हाळ्यात संगमेश्वर रेल्वे स्थानकातील नळ कोरडे ठाक!
संगमेश्वर : कोकण रेल्वे महामार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक म्हणजे संगमेश्वर रोड. या स्थानकातून रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. सध्या सुरू असलेल्या रणरणत्या उन्हाळ्यात स्थानकावरील दोन प्लॅटफॉर्मवरील नळाना पाण्याचा थेंबही नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
संगमेश्वर रेल्वे स्टेशनमधून कोकण रेल्वेला वर्षाला कोटीच्या घरात उत्पन्न मिळूनही सुविधा कोणाकडे मात्र रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या स्थानकावरील प्रवासी सुविधांबाबत जागरूक असलेले पत्रकार संदेश जिमन यांनी केला आहे.
या स्थानकातील फलाट क्रमांक 1 व 2 वरील पाणपोईंना नळ असून त्याला पाणीच नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. आता कडक उन्हाळा सुरू झाला असून उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात प्रवाशांना जाणवत आहेत. वारंवार स्टेशन मॅनेजर यांच्या ही बाब लक्षात आणून देण्यात आली आहे. तरी त्यावर कोणतीच उपाययोजना केली जात नाही, असे जिमन यांचे म्हणणे आहे.