मत्स्यगंधा, नेत्रावती एक्सप्रेसच्या संगमेश्वर थांब्यासाठी रेल्वेच्या मुंबईतील जनशिकायत कार्यालयाला पत्र
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या संगमेश्वर रोड स्थानकात नेत्रावती तसेच मत्स्यगंधा एक्स्प्रेसला थांबा मिळण्यासंदर्भात रेल्वेच्या जन शिकायत कार्यालयाला नुकतेच पत्र देण्यात आले. संगमेश्वरवासी यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषणाचा इशारा दिलेल्या शिष्टमंडळाच्या वतीने हे पत्र देण्यात आले.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मुंबईतील जनशिकायत कार्यालयाला हे पत्र देण्यात आले आहे. चिपळूण संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून संगमेश्वर वासीय प्रवासी जनतेच्या वतीने हे पत्र ना. रावसाहेब दानवे यांच्यापर्यंत पोहोचवण्याची विनंती यावेळी करण्यात आली.
दरम्यान, कोकण रेल्वेच्या रत्नागिरी येथील क्षेत्रीय कार्यालयाला या दोन्ही एक्सप्रेस गाड्यांना संगमेश्वरात थांबा मिळण्यासंदर्भात आमरण उपोषणाचा इशारा देणारे पत्र देण्यात आले आहे. यानंतर कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या उत्तरादाखल पत्रात क्षेत्रीय कार्यालयाकडून थातूरमातूर उत्तर देण्यात आल्याचा आक्षेप घेत आंदोलनकर्त्यांनी नेत्रावती तसेच मत्स्यगंधा एक्सप्रेसला संगमेश्वर रोड स्थानकात थांबा मिळेपर्यंत उपोषणाच्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.
या पाठोपाठ दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मुंबईतील कार्यालयाला पत्र देऊन त्यांचे याकडे लक्ष वेधण्यात आल्याने रेल्वे या दोन्ही एक्सप्रेसला संगमेश्वर थांबा देणे या संदर्भात कोणता निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.