विस्टाडोम कोचसह मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेस सुसाट!
प्रवाशांच्या वाढत्या पसंतीमुळे १४ एप्रिलपासून आणखी एक विस्टाडोम कोच जोडणार
रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसला आणखी एक विस्टाडोम कोच दि. १४ एप्रिलपासून कायमस्वरूपी जोडण्यात येणार आहे. मुंबई- गोवा प्रवासादरम्यान पर्यटक तसेच प्रवाशांची विस्टाडोम कोचला असलेली वाढती पसंती लक्षात घेऊन रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस तसेच 22119 /22120 या तेजस एक्सप्रेसला प्रत्येकी एक पर्यटक पूरक कोच म्हणजेच पारदर्शक काचांनी युक्त असलेला डबा जोडण्यात आला आहे. या कोचमधून प्रवास करणाऱ्या पर्यटक तसेच प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान कोकणचे सौंदर्य न्याहाळणे, कॅमेरे तसेच मोबाईलमध्ये टिपणे सोपे झाले आहे. गरजेनुसार फिरवता येणारी आसने, काचांनीयुक्त पारदर्शक छत तसेच कोचच्या खिडक्यांना असलेल्या प्रशस्त काचा यामुळे कोकण रेल्वे मार्गावर जाणाऱ्या जनशताब्दी तसेच तेजस एक्सप्रेसला जोडलेल्या विस्टाडोम कोचला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
तेजस एक्सप्रेसला लावत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन आता दिनांक 14 एप्रिल 2023 पासून आणखी एक विस्टा डोम कोच जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. यामुळे आता तेजस एक्सप्रेस एकूण दोन विस्टाडोम कोचसह धावणार आहे.