Konkan Railway | नवी कोरी वंदे भारत एक्सप्रेस उद्घाटनासाठी मडगावच्या दिशेने रवाना!
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भरत एक्सप्रेसची प्रतीक्षा संपली
रत्नागिरी : आयसीएफ चेन्नई येथून निघालेला आठ डब्यांचा नवाकोरा वंदे भारत एक्सप्रेसचा रेक मडगाव -मुंबई मार्गावरील उद्घाटन सोहळ्यासाठी रवाना झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणार असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाचे निश्चित अजूनही तारीख जाहीर झाली नसली तरी आता अवघ्या काही दिवसात कोकणवासियांची प्रतीक्षा संपणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची महत्त्वाची अपडेट…
नव्या कोऱ्या आठ डब्यांच्या उद्घाटनासाठी येणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसने शनिवारी (२७ मे ) रात्री १० वाजून ३२ मिनिटांनी उडपी स्थानक सोडून ही रिकामी गाडी मडगाव स्थानकाकडे मार्गस्थ झाली आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोव्यातील मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी अलीकडेच यशस्वीपणे घेण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर नजीकच्या काही दिवसात वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार वंदे भारत एक्सप्रेसला गोव्यातील मडगाव जंक्शनवरून मुंबईतील सीएसएमटीपर्यंत धावण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या मडगाव स्थानकावर तयारी देखील करण्यात आली आहे.
शनिवारी सायंकाळपर्यंत वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मिळालेल्या अपडेटेड माहितीनुसार आयसीएफ चेन्नई ( चेन्नई मधील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी ) येथून कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी नवा कोरा आठ डब्यांचा रेक रवाना झाला आहे. पुढील काही तासात तो मडगावला कोकण रेल्वेकडे येणे अपेक्षित आहे.
देशभरात आतापर्यंत सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा इतिहास पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा बावटा दाखवतील, असा अंदाज आहे. याआधी मुंबईतून सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मान मिळाला आहे त्यामुळे यावेळी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मडगाव येथून मुंबईसाठी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाऊ शकतो, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
निमंत्रितांना घेऊन धावणार कोरे मार्गावरील पहिली वंदे भारत एक्सप्रेस!
कोकण रेल्वे मार्ग धावणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही उद्घाटनाच्या फेरीवेळी केवळ निमंत्रितांना घेऊन धावणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
तेजस एक्सप्रेसप्रमाणे थांबे घेणार की थोडा बदल करणार याकडे लक्ष
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसबाबत रेल्वे प्रवासी तसेच पर्यटकांमध्ये कमालीची उत्सुकता असताना या गाडीला नेमके कोणते थांबे दिले जातात, याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे. वंदे भारत खेडला थांबवावी असा आग्रह जल फाउंडेशनसह कोकण विकास समितीने धरला आहे. त्यामुळे ती खेडला थांबवली जाते की याच मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसप्रमाणे ती थांबे घेणार, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.