रत्नागिरी : आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या ‘बाल जगत’ या कार्यक्रमात रविवार, २६ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता ‘आम्ही निसर्गाचे वारसदार’ ही बालनाटिका प्रसारित होणार आहे. ही नाटिका नवनिर्माण हायस्कूल, रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांनी सादर केली असून तिचे लेखन सोनाली सावंत यांनी केले आहे. नाटिकेसाठी नवनिर्माण हायस्कूलच्या संचालिका सीमा हेगशेट्ये यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

या नाटिकेत माणसांकडून नकळत होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीचे परिणाम, निसर्गसंवर्धनाची गरज, तसेच भविष्यातील पिढ्यांसाठी निरोगी आणि समृद्ध पृथ्वी जपण्याची जबाबदारी प्रभावी प्रसंगांमधून उलगडण्यात आली आहे. निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी लहान वयापासूनच चांगल्या सवयी अंगीकारणे आणि पर्यावरणाबाबत जागरूक राहणे, हा महत्त्वाचा संदेश या नाटिकेतून देण्यात आला आहे.
नाटिकेतील पात्रांमध्ये अथर्व – श्लोक वळवी, ओंकार – अनुज करकरे, सई – स्वरा मोहिते, आजोबा – श्लोक अलकुंटे, भविष्यातला मुलगा – श्वेत जाधव, शिक्षक – सार्थक चव्हाण, आई – तीर्था नाखरेकर आणि बाबा – अथर्व कोकरे यांनी भूमिका साकारल्या आहेत.
कार्यक्रमाचे निवेदन सोनाली सावंत यांनी केले असून सादरकर्ते विवेक वानखडे आहेत.
श्रोत्यांना हा कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरीच्या मध्यम लहरी ११४३ किलोहर्ट्झ, एफ.एम. १०१.५ मेगाहर्ट्झ, तसेच NewsOnAir मोबाईल अॅपवर थेट ऐकता येणार आहे. याशिवाय कार्यक्रमाच्या प्रसारणानंतर YouTube – AIR Ratnagiri 1248 या यूट्यूब चॅनलवर श्रोत्यांना या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल.
