देवरुखवासीयांसाठी बावनदी धरणावरील बंधाऱ्याचे भूमिपूजन

रत्नागिरी : देवरुख नगरपंचायत हद्दीतील नागरिकांच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बावनदीवर धरण बांधकामाचे भूमीपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
देवरुख शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून एक कोटी रुपये देण्याचा निर्णय यावेळी पालकमंत्र्यांनी जाहीर केला. संगमेश्वर तालुक्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं जागतिक दर्जाचं स्मारक उभारण्यासाठी आवश्यक तो निधी देण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं यावेळी सांगितले.

देवरुख शहरातील प्रत्येक नागरिकाला पाणी मिळालं पाहिजे, असं नियोजन नगरपंचायत प्रशासनानं केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या ९ ते १४ वयोगटातील मुलींना कर्करोग होऊ नये म्हणून ५० हजार मुलींना मोफत लस देण्याचा निर्णय घेतलाय, असा निर्णय घेणारा रत्नागिरी हा देशातील पहिला जिल्हा आहे, हे देखील यानिमित्तानं पालकमंत्री उपस्थितांना सांगितलले.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, रत्नागिरी जि.प. चे माजी अध्यक्ष रोहनजी बने, जि.प. चे माजी सभापती बाबूजी म्हाप, देवरुख नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये, दोन्ही गावचे सरपंच, उपतालुकाप्रमुख सचिन मांगले, तहसीलदार श्रीमती साबळे, मुख्याधिकारी श्री. विसपुते, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. सुर्वे, कार्यकारी अभियंता श्री. सलगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरप्रमुख हनिफजी हरचिरकर, नगरसेवक प्रफुल भुवड, वैभवजी पवार यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.