- पादचारी तसेच वाहनधारकांना करावा लागतोय नाहक सामना!
रत्नागिरी : शहरातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून अर्ध्यावर सोडून देण्यात आले आहे. तयार झालेल्या रस्त्याच्या साईडपट्ट्यांचे डांबरीकरण देखील अर्ध्यावरच सोडून देण्यात आल्याने पादचारी नागरिक तसेच वाहनधारकांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे.
रत्नागिरी शहरातील डांबरीकृत रस्त्यांसाठी काँक्रिटीकरण योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्यावर दीड वर्षांचा कालावधी उलटून देखील शहरातील काँक्रीटीकरण्याचे हे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. दि. १७ डिसेंबर २०२३ रोजी साळवी स्टॉप येथे काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता.

नगरोत्थान योजनेतून सुमारे १०० कोटी रुपये खर्चून हे काम करण्यात येत आहे. योजनेतून शहरातील माळनाका ते एसटी स्टँडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गीकेचे काँक्रिटीकरण सुरू देखील करण्यात आलेले नाही. काँक्रिटीकरणाची ठेकेदार कंपनीची यंत्रणा मागील काही महिन्यांपासून शासकीय विश्रामगृहासमोर अक्षरशः गुंडाळून ठेवण्यात आली आहे.

याआधी विरोधक या प्रश्नावर किमान आवाज उठवताना दिसत होते. मात्र, त्यांचा आवाजही आता बंद झाल्याने पादचारी तसेच वाहनधारकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. शहरात काँक्रिटीकरणाचे काम सुरू होऊन तब्बल दीड वर्षांचा कालावधी पूर्ण झाला तरीही पूर्ण झालेले नाही, याबाबत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्यासाठी कुणी शिल्लकच राहिले नाही का, असा संतप्त सवाल गैरसाईंचा सामना करणारे वाहनधारक तसेच नागरिक विचारत आहेत.
![]()
