‘आनंद माडगूळकर’ यांच्या सहवासात युनायटेड गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी ‘आनंदमय कोशाचा ‘ घेतला अनुभव!

चिपळूण : आनंदमय कोश म्हणजे आपल्या मनाला ज्यात आनंद मिळतो, समाधान मिळतं अशा कामात स्वतःला गुंतवून घेणं आणि सेवा आणि समर्पित भावाने निरपेक्षपणे आनंद अनुभवणे!
गुरुकुल मध्ये पंचकोश आधारित विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करत असताना अन्नमय, प्राणमय,मनोमय,विज्ञानमय आणि आनंदमय अशा पाच कोशां भोवती गुंफलेली उपक्रम रचना असते. यातील आनंदमय कोशाचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी वर्षभर विविध सांस्कृतिक, पारंपरिक, सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते.

आषाढी एकादशी, गणेशोत्सव अशा कार्यक्रमांसोबतच सामाजिक जागृतीचे कार्यक्रम, स्पर्धा इत्यादीमध्ये नियमितपणे मुलं सहभागी होत असतात. युनायटेड गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना यावेळी एक आगळीवेगळी संधी मिळाली अशाच एका सामाजिक उद्देशाने,सांस्कृतिक भावनेने संपन्न झालेल्या कार्यक्रमात सहभागाची!
तो कार्यक्रम म्हणजे बापट परिवार आणि वाईल्ड लाईफ अनलिमिटेड आयोजित ‘अथ श्री रामायण!’
दिनांक २४ आणि २५ जानेवारी या दोन दिवशी चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात गुरुकुल मधील ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी काढणे, प्रेक्षकांचे गंध लावून स्वागत करणे, संयोजकांच्या सूचनेनुसार पेढ्यांचे आणि तिळगुळाचे वाटप करणे अशा आवश्यक त्या छोट्या मोठ्या सहकार्यासोबतच प्रत्यक्ष रंगमंचीय कार्यक्रमात दोन्ही दिवस अनुक्रमे जय गंगे जय भागीरथी आणि सेतू बांधारे सागरी ही गीत रामायणातील दोन प्रसिद्ध गीते अत्यंत उत्तम प्रकारे सामूहिक गायन स्वरूपात सादरीकरण करणे अशा विविध प्रकारच्या सहभागाने खऱ्या अर्थाने आनंदमय कोश विद्यार्थ्यांनी अनुभवला!
महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांचे पुत्र श्री.आनंद माडगूळकर यांची या कार्यक्रमाला उपस्थिती हा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत भाग्याचा क्षण! गीत सादरीकरणात सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंदजी माडगूळकर यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. हा सर्व विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला अत्यंत संस्मरणीय क्षण गुरुकुलच्या गीत मंचातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण अशी मूलभूत संकल्पना असणाऱ्या गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांनी या अथ श्रीरामायण या कार्यक्रमाच्या निमित्ताने गाण्यांच्या पूर्वतयारी पासून प्रत्यक्ष कार्यक्रम संपन्न होईपर्यंतच्या जवळपास दीड महिन्याच्या कालावधीत पुष्कळ छोटी-मोठे कौशल्य नकळत अनुभवाने समजून घेतली.
अभ्यासासाठी शंभर टक्के प्रयत्न करत, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता जपत विविध उपक्रमांच्या आधारे अन्नमय,प्राणमय,मनोमय,विज्ञानमय आणि आनंदमय अशा पाच कोशांच्या माध्यमातून वर्षभर अनेक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी गुरुकुलामध्ये नियमित होत असतात आणि विद्यार्थी यामधून अनुभव समृद्ध होत असतात.
आता आलेल्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अंतर्भूत असणाऱ्या पंचकोश विकसनाचे व्रत घेऊन सहा वर्षांपूर्वीच दूरदृष्टीने पंचकोशाधारित गुरुकुल असे स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात प्रवाही आणि प्रभावीपणे प्रत्यक्षात आणणाऱ्या परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या गुरुकुल विभागाला नक्की भेट द्या आणि आपल्या पाल्याच्या अष्टपैलू व्यक्तिमत्व विकासासाठी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा.





