दहावी बोर्ड परीक्षेस उत्साहात प्रारंभ

- कोकण मंडळात गैरप्रकाराची नोंद नाही
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचेमार्फत घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षा शुक्रवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात सुरू झाली. ही परीक्षा दिनांक १८ मार्च २०२६ पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. आज कोकण विभागात एकाही गैरप्रकाराची नोंद झालेली नाही.
दहावी परीक्षेसाठी कोकण विभागीय मंडळामध्ये एकूण विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. ही परीक्षा एकूण मुख्य परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली आहे.
परीक्षा केंद्रे
रत्नागिरी ७३
सिंधुदुर्ग४१
एकूण परीक्षा केंद्र ११४
इ.१० वी एकूण शाळा
रत्नागिरी ४१२
सिंधुदुर्ग २२८
एकूण ६४०
इयत्ता १० वी विद्यार्थी संख्या
रत्नागिरी १७४५०
सिंधुदुर्ग ८३२७
एकूण परीक्षार्थी २५७७७
परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी कोकण
विभागीय मंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना शाळांमार्फत परीक्षार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. सकाळ सत्रात स. १०.३० वाजण्यापूर्वीच परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर हजर झाले. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन ठिकठिकाणी स्वागत झाले.
“सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे केंद्रांवरील परीक्षा शिस्तबद्ध पद्धतीने होत आहे, शिवाय रेकॉर्डिंग जतन करण्याच्या सूचना केंद्रसंचालकांना दिलेल्या आहेत. जिल्हा प्रशासनाचे ही उत्तम नियोजन असल्याने सुरळीत परीक्षा पार पडत आहेत.
–राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर मंडळ
गतवर्षीप्रमाणेच फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेसाठीही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे.
दोन्ही जिल्ह्यात परीक्षा केंद्र इतकी बैठकी पथके नियुक्त करण्यात आली आहे. तर दोन्ही जिल्ह्यात सात भरारी पथके कार्यरत होती.





