भोंदू बाबा अशोक खरातची  उरणमध्ये जमीन 

Team RatnagiriLive
4 Min Read
  • फरार बायकोच्या नावावर ५८ लाखांची जमीन
  • महसूल-निबंधक यंत्रणेचा ‘एक्सप्रेस’ कारभार उघड

उरण दि २१ (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्रभर गाजत असलेल्या भोंदूगिरी प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात तुरुंगात असताना त्याची ‘वरात’ उरणमध्ये धडकली, अशी संतप्त चर्चा सध्या उरण तालुक्यात रंगत आहे. चाणजे (ता. उरण) येथे समोर आलेल्या जमीन व्यवहाराने केवळ महसूलच नव्हे, तर निबंधक यंत्रणेच्या पारदर्शकतेवरही मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. कारण, ज्या दिवशी अशोक खरात अटकेत गेला, त्याच दिवशी त्याच्या फरार पत्नी कल्पना अशोक खरात हिच्या नावावर जमिनीच्या नोंदीची प्रक्रिया सुरू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दिनांक १२ मार्च २०२६ रोजी अस्मिता अविनाश म्हात्रे व कैलास मिश्रीमल शहा यांच्याकडून सर्वे नंबर ३७१/३ (क्षेत्र ०.२०.०० आर) ही जमीन नोंदणीकृत खरेदीखताद्वारे कल्पना खरात यांच्या नावावर घेण्यात आली. हा व्यवहार सुमारे ५८ लाख ५० हजार रुपयांचा असल्याचे समजते. व्यवहारानंतर अवघ्या काही दिवसांतच, १७मार्च २०२६ रोजी तलाठी सजा चाणजे यांनी वर्दी नोटीस चावडीवर प्रसिद्ध केली आणि नेमक्या याच दिवशी अशोक खरात याला पोलिसांनी अटक केल्याची नोंद आहे.अटक आणि नोंद प्रक्रिया एकाच दिवशी हा निव्वळ योगायोग आहे का, की आधीच आखलेली ‘योजना’ ? असा सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे.

अटक आणि नोंद प्रक्रिया एकाच दिवशी हा निव्वळ योगायोग आहे का, की आधीच आखलेली ‘योजना’ ? असा सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे.

यानंतरही व्यवहाराचा वेग थांबला नाही. दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी फेरफार क्रमांक ८३५१ मंजूर करण्यात आला. म्हणजे, संपूर्ण व्यवहाराची महसूल नोंद प्रक्रिया अवघ्या एका महिन्याच्या आत पूर्ण करण्यात आली. विशेष म्हणजे, या काळात संबंधित महिला फरार असल्याची चर्चा सुरू असतानाही कागदोपत्री प्रक्रिया वेगाने पार पडल्याने संशय अधिकच बळावला आहे.

सामान्य नागरिकांना सातबाऱ्यावर नाव चढवण्यासाठी महिने वर्षे लागतात, आणि इथे फरार व्यक्तीच्या नावावर जमीन ‘एक्सप्रेस’ वेगाने ? हा कसला प्रशासनिक न्याय ?

या संपूर्ण प्रकरणात दुय्यम निबंधक उरण, तहसीलदार उरण, मंडळ अधिकारी चाणजे आणि तलाठी चाणजे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. व्यवहार करताना आवश्यक ती पडताळणी झाली का ? संबंधित व्यक्तीची स्थिती (फरार /गुन्हेगारी प्रकरण) तपासली का ? की कागद ‘जाणूनबुजून’ पुढे ढकलले गेले ? या सर्व बाबींची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.

कागद तपासले गेले की ‘व्यवहार’ तपासूनच फाईल पुढे सरकली ? असा थेट सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.

जमीन विक्रेते अस्मिता अविनाश म्हात्रे व कैलास मिश्रीमल शहा यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या व्यवहारात नियमांचे उल्लंघन झाले का ? व्यवहारासाठी आवश्यक असलेली पडताळणी व कागदपत्रांची तपासणी योग्य पद्धतीने झाली का ? या सर्व मुद्यांवर सखोल चौकशीची गरज व्यक्त होत आहे.

दरम्यान, नायब तहसीलदार पेडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर फेरफार नोंद कार्यालयात प्राप्त झाली होती. मात्र पुढील कार्यवाहीसाठी कोणीही पुढे न आल्याने आणि सातबारा उताऱ्यावर नोंद न झाल्याने ती रद्द करण्यात आली आहे. तथापि, व्यवहार झालेला असल्याने पुढे कोणी आले तर नोंद पुन्हा करता येऊ शकते.म्हणजे व्यवहार ‘रद्द’ असला तरी ‘जिवंत’ आहे ? आणि कधीही पुन्हा सक्रिय होऊ शकतो ? यामुळेच नागरिकांमध्ये अधिक संभ्रम आणि संताप निर्माण झाला आहे.तसेच, या प्रकरणाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी एस आय टी कडे दिली आहे की नाही, याबाबतही स्पष्टता नाही. त्यामुळे या व्यवहारामागे नेमकं कोणतं ‘समीकरण’ काम करत होतं, याची शंका अधिकच गडद होत आहे.

उरणमध्ये आता नागरिकांमधून ठाम मागण्या पुढे येत आहेत. त्यामध्ये या संपूर्ण प्रकरणाची एस आय टीमार्फत सखोल चौकशी करावी, दुय्यम निबंधक व महसूल अधिकाऱ्यांची भूमिका तपासून जबाबदारी निश्चित करावी, हा जमीन व्यवहार कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा, हा केवळ एक जमीन व्यवहार नाही हा प्रशासनाच्या पारदर्शकतेवर पडलेला गंभीर डाग असल्याचे बोलले जात आहे आणि हा डाग पुसला गेला नाही, तर भविष्यात अशा ‘एक्सप्रेस व्यवहारां’ना आळा बसणार नाही, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment