- सेवा संकल्प अभियान ; वडार समाज सेवा गणेश मंडळात रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घटनात्मक पदावरील सेवेची २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच ‘सेवा परमो धर्म:’ हा विचार तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यात १७ ऑक्टोबरपर्यंत ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कुवारबाव उत्कर्षनगर येथील वडार समाज सेवा गणेशोत्सव मंडळ येथे रक्तदान आणि आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे उपस्थित होत्या.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी रक्तपेढी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय यांच्यावतीने आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर राबवून उत्सवाचे रुपांतर सामाजिक सेवेत करणाऱ्या या गणेश मंडळाचे जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी विशेष कौतुक केले. सामान्य नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग सक्षम आहे. आरोग्य विभागाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा. वेळेच्या वेळी आपल्या आरोग्याची तपासणी करुन निरोगी आरोग्य जगण्यासाठी नागरिकांनी अशा आरोग्य शिबिरांचा पुढाकार घ्यावा. त्याचबरोबर महिन्याभरात महसूल, भूमिअभिलेख, कौशल्य विकास, सहकार अशा विविध विभागांच्या योजनांबाबत उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्या सर्वांचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी यावेळी केले.
सेवा संकल्प अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे
लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध शासकीय योजनांची माहिती संबंधित विभागामार्फत देण्यात येणार आहे. या सेवा संकल्प अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्तपण आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे यांनी केले. या महिन्याभरात विकसित भारत संकल्पनेवर विविध स्पर्धांचे आयोजन होणार आहे. आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, वृक्षारोपणे, व्यवसमुक्ती, डिजीटल साक्षरता, सायबर सुरक्षा यावर विशेष जनजागृती करुन सेवा पुरविण्यात येणार आहे. या सर्वांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असेही त्या म्हणाल्या.
जिल्हाधिकारी श्री जिंदल यांच्या हस्ते सक्तदात्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील आणि गटविकास अधिकारी उमेश गावधडकर यांच्यासह आरोग्य कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
