केंद्र सरकारच्या योजनांचा लेखा जोखा जनतेपर्यंत पोहचवून पक्ष मजबुतीसाठी प्रयत्न करा : प्रमोद अधटराव
मोदी@९ अभियान संगमेश्वर तालुक्यात यशस्वी करणेसाठी बैठक संपन्न
देवरुख (सुरेश सप्रे) : नरेंद्र मोदीनी पंतप्रधान म्हणून आता ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. आता वेळ आहे ती सिंहावलोकन करण्याची. केलेला विकास आणि अद्याप राहिलेला विकासाबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे. या मतदारसंघात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था लोकांनी मोठ्या विश्वासाने भाजपाच्या ताब्यात दिल्या आहेत. अजूनही मोठे यश बाकी आहे. याचसाठी ‘मोदी@९’ अभियानांतर्गत संगमेश्वर तालुका भाजपा कार्यालय देवरुख येथे संयुक्त मोर्चा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा शासनकाळ सुवर्णकाळ असल्याचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विश्लेषकांनी अनेकवेळा नमूद केले आहे. देशाची अर्थव्यवस्था, आरोग्य व्यवस्था, संरक्षण व्यवस्था यांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे श्रेय मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारला द्यावेच लागेल. इतकेच काय भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणात ताठरपणा आणून आज जागतिक राजकारणात देशाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून देण्याचे कामदेखील मोदी सरकारने केले आहे, असे ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अभिजित शेट्ये यांनी सांगून यासर्व कामाचा लेखा जोखा तळा गाळातील जनतेपर्यंत पोहचवत पक्ष बळकट करणेसाठी गावागावात बैठका घेवून हे अभियान यशस्वी करा असे आवाहनही शेट्ये यांनी केले
या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा संघटन सरचिटणीस राजेश सावंत व चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव यांनी आजपर्यंतच्या केलेल्या कामांचा आढावा घेत केंद्र सरकारच्या सर्व कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे नियोजन करा असे आवाहन अधटराव यांनी केले
या बैठकीला तालुक्यातील, युवा, महिला, कामगार, ओबीसी, वाहतूक, शेतकरी, उद्योग.आदी विविध मोर्चांचे तालुका संयोजक, सोशल मिडीयाचे योगेश मुळे तसेच तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. सदर बैठकीसाठी ओबीसी जिल्हा अध्यक्ष अभिजित शेट्ये तसेच महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. कोमल रहाटे यांनी मेहनत घेतली.