नैसर्गिक आपत्तीग्रस्त मच्छीमारांना केंद्र सरकारचा दिलासा!

Team RatnagiriLive
2 Min Read
  • बोटी व जाळ्यांच्या नुकसानीसाठी आर्थिक मदत वाढवली
  • राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (NDRF) सुधारित निकषांमध्ये मत्स्यव्यवसायाचा समावेश; २०२६ ते २०३१ या कालावधीत लागू राहणार नवे निकष

रत्नागिरी : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या मच्छीमारांना आणि मत्स्यव्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) अंतर्गत मदतीच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली असून, २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी हे सुधारित निकष लागू राहणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त मच्छीमार, लहान व सीमांत शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

मत्स्यव्यवसायासाठी सुधारित आर्थिक मदतीचे निकष पुढीलप्रमाणे :
अंशतः नुकसान झालेल्या मासेमारी बोटींच्या दुरुस्तीसाठी : प्रति बोट ८,००० रुपये आर्थिक मदत.
अंशतः नुकसान झालेल्या मासेमारी जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी : प्रति जाळे ४,००० रुपये मदत.
पूर्णतः नुकसान झालेल्या मासेमारी बोटींच्या पुनर्स्थापनेसाठी : प्रति बोट १९,००० रुपये मदत.
पूर्णतः नुकसान झालेल्या मासेमारी जाळ्यांच्या पुनर्स्थापनेसाठी : प्रति जाळे ५,१०० रुपये मदत.
मत्स्यबीज फार्मसाठी : लहान व सीमांत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १३,००० रुपये इनपुट सबसिडी.

या मदतीसाठी काही पात्रता अटीही निश्चित करण्यात आल्या आहेत. संबंधित नुकसानीसाठी अन्य शासकीय योजनेंतर्गत मदत घेतलेली असल्यास त्याच नुकसानीसाठी पुन्हा मदत मिळणार नाही. तसेच विमा संरक्षणातून मिळालेली रक्कम असल्यास ती आर्थिक मदतीत समायोजित केली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या या सुधारित निकषांमुळे नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसान सहन करणाऱ्या मच्छीमारांना बोटी व जाळ्यांच्या दुरुस्ती आणि पुनर्स्थापनेसाठी आर्थिक आधार मिळणार असून, मत्स्यव्यवसायाचे नुकसान भरून काढण्यास मदत होणार आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment