दापोलीत १० हजारांची लाच घेताना महिला तलाठी ACB च्या जाळ्यात!

Team RatnagiriLive
1 Min Read

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत, फेरफार उताऱ्यावर नाव नोंदवण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महिला ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहात पकडले आहे.

श्रद्धा बालाजी बंडे (वय ३०), असे या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या महिला लोकसेवकाचे नाव असून त्या नानटे येथे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) म्हणून कार्यरत आहेत.

या प्रकरणातील तक्रारदार आणि त्यांच्या मित्राने मौजे तेरेवायंगणी येथे एकत्रितपणे जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर फेरफार नोंद करून त्याची प्रत देण्यासाठी श्रद्धा बंडे यांनी तक्रारदाराकडे १०,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराने याप्रकरणी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, आज २५ फेब्रुवारी २०२६ रोजी तहसीलदार कार्यालय, दापोली येथे सापळा रचण्यात आला.

यावेळी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना श्रद्धा बंडे यांना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सुहास रोकडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केली. सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment