कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण आवश्यक : उद्योग मंत्री उदय सामंत यांचे मत

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी  : कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांना भारतीय रेल्वेच्या इतर झोनप्रमाणे दर्जेदार सुविधा मिळाव्यात, तसेच प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणे अत्यावश्यक असल्याचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात पूर्वी असलेली पिटलाईन पुन्हा सुरू करणे तसेच गाड्यांमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था पूर्ववत करण्याबाबत अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या वतीने गुरुवारी निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे दादर-रत्नागिरी पॅसेंजर  गाडी पूर्वीप्रमाणे दादर स्थानकावरून रत्नागिरीसाठी सोडण्याची  करण्याची मागणीही करण्यात आली.


गुरुवारी सायंकाळी ५ वाजता रत्नागिरी येथे आयोजित जनता दरबारात उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी कोकण रेल्वेच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या निधीची गरज असल्याचे सांगितले आणि त्यासाठी भारतीय रेल्वेत विलीनीकरण हा एकमेव प्रभावी पर्याय असल्याचे अधोरेखित केले.
समितीच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले. यावेळी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या वतीने रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार दीपक शिंगण यांनी हे निवेदन उद्योग मंत्री उदय सामंत यांना सादर केले.
अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय सरोज मधुकर महापदी यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment