स्वातंत्र्यदिनी दहावी-बारावीचे विद्यार्थी घेणार गैरप्रकारमुक्त परीक्षेची शपथ!

Team RatnagiriLive
2 Min Read

रत्नागिरी : फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी गैरप्रकारापासून दूर राहण्याची शपथ स्वातंत्र्यदिनी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळाने केले आहे.

कोकण विभागीय मंडळाचे विभागीय सचिव पुनीता गुरव यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्य, मुख्याध्यापकांना याबाबत पत्र पाठविले आहे. परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त आणि निकोप वातावरणात पार पडण्यासाठी विद्यार्थ्यांकडून शपथ घेण्यात यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

परीक्षेपूर्वी तसेच परीक्षा सुरू असताना कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करण्याची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी करावी. तसेच परीक्षेत गैरप्रकार करण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तीला त्यापासून परावृत्त करण्याचा निर्धारही विद्यार्थ्यांनी करावा, असे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी मंडळाच्या सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, सातत्याने अभ्यास करून प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करावा आणि परीक्षा आत्मविश्वासाने व तणावविरहित वातावरणात द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. योग्य गुणांनी उत्तीर्ण होऊन आपल्या शाळेचे, आई-वडिलांचे व गुरुजनांचे नाव उज्ज्वल करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा, अशी अपेक्षाही मंडळाने व्यक्त केली आहे.

शपथ घेण्याच्या सूचना

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.१५ वाजता विद्यार्थ्यांकडून ही शपथ घेण्यात यावी, अशा सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असेही कोकण विभागीय मंडळाने स्पष्ट केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment