उरण (विठ्ठल ममताबादे)) : ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर आणि मोफत औषधोपचार मिळावा, या उद्देशाने उरणमधील ज्येष्ठ समाजसेवक दाम्पत्याने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेते ज्येष्ठ समाजसेवक एस. आर. तोगरे आणि सुमनताई संग्राम तोगरे यांच्या वतीने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र (जीते) येथे ३४८ प्रकारची औषधे मोफत दान करण्यात आली आहेत.
या औषधांची अंदाजे किंमत सुमारे एक ते सव्वा लाख रुपये असून, यामुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
२५ जिल्ह्यांत २ कोटींहून अधिक किमतीच्या औषधांचे वाटप
तोगरे दाम्पत्याचे हे सामाजिक कार्य केवळ उरण पुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आहे. त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांतील १६८ शासकीय रुग्णालये आणि अनेक नोंदणीकृत सामाजिक संस्थांना तब्बल दोन कोटी रुपयांहून अधिक किमतीची औषधे मोफत दान केली आहेत. आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक सेवेचा एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, जीते येथे औषध सुपूर्द
जीते येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला औषधे सुपूर्द करताना विविध वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने:
- वैद्यकीय अधिकारी: डॉ. अपर्णा माळगे
- औषध निर्माण अधिकारी: श्रीमती रुपाली म्हात्रे
- लॅब टेक्निशियन: श्रीमती प्रियांका लोहार
- आरोग्य निरीक्षक: उदय म्हात्रे व राजेश म्हात्रे
- आरोग्य सेवक: भूषण पाटील
- स्टाफ नर्स: श्रीमती सुनीता गवळी
- स्त्री परिचर व सफाई कामगार: श्रीमती ज्योत्स्ना दळवी आणि श्रीमती प्रफुल्ला नाईक
या सर्व उपस्थितांनी तोगरे दाम्पत्याच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला बळकट करण्यासाठी अशा उपक्रमांची अत्यंत गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
