- १२ तासांत आंबा बागायतदारांना २०९ कोटींची मदत जाहीर
रत्नागिरी : पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी आंबा-काजू उत्पादकांच्या हक्कासाठी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर, अवघ्या १२ तासांत शासनाने २०९ कोटी १० लाख रुपयांची मदत जाहीर केल्यामुळे या ऐतिहासिक निर्णयाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रत्नागिरी शहरातील विविध मध्यवर्ती ठिकाणी आणि प्रमुख चौकांमध्ये ‘जनतेसाठी आक्रमक, शेतकऱ्यांसाठी ठाम… आमदार निलेश राणे!’ अशा आशयाचे मोठे आणि आकर्षक बॅनर झळकले आहेत.
अधिवेशनात गुरुवारी आमदार निलेश राणे यांनी थेट कृषीमंत्र्यांना धारेवर धरत अभ्यासूपणे कोकणच्या बळिराजाची बाजू मांडली होती. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि अवघ्या १२ तासांत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २०९ कोटी १० लाख ६ हजार रुपयांच्या मदतीचा शासन निर्णय (GR) जारी झाला. या निर्णयाचा लाभ कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील १ लाख ३४ हजार २५१ शेतकऱ्यांना होणार असून ९२ हजार ३४२ हेक्टरवरील क्षेत्राला याचा दिलासा मिळाला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यासाठी सर्वाधिक ९८.४४ कोटी, तर सिंधुदुर्गसाठी ७९.०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सत्तेत असूनही जनतेसाठी प्रशासनाला झुकवण्याच्या या किमयेमुळे वर्षभराची चिंता काही तासांत मिटल्याने, कोकणातील तमाम शेतकऱ्यांनी शहरात ठिकठिकाणी हे बॅनर्स लावून आमदार निलेश राणे यांच्याबद्दल आपला उत्स्फूर्त पाठिंबा आणि आनंद व्यक्त केला आहे.
