नागपंचमी दिनी मुंग्या आणि वारुळांच्या संरक्षणाचा नवा संदेश!
लांजा : नागपंचमीचे औचित्य साधून आज लांजात पर्यावरणाचे रक्षण करणारे मुंग्यांचे वारूळ यांची पूजा करण्यात येऊन मुंग्या आणि वारुळे यांचे संरक्षण करण्याचा एक नवा संदेश देण्यात आला.
श्रावण महिन्यातील नागपंचमी हा पवित्र सण. नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी पूजाअर्चा केली जाते. आज नागपंचमीचा सण सर्वत्र उत्साहात आणि धार्मिक परंपरेने साजरा झाला. या सणाला पर्यावरण रक्षणाची एक वेगळी झालर आहे.
नागपंचमी सणाचे महत्व लक्षात घेऊन आज काहींनी घरामध्ये मातीचा नाग आणून पूजा केली तर काही महिला भगिनींनी मुंग्यांच्या वारूळांची पूजा केली. वारुळाभोवती दूध, दही साखर, लाहया आदी नैवेद्य दाखवला इवलिशी मुंगी निसर्ग साखळीतली महत्त्वाचा कीटक आहे. पर्यावरण संतुलनात मुंग्याचे महत्व मोठे आहे. मुंगी ही वसाहतवादी, संघटित जीवन कसे जगावे, निसर्गाचा आर्किटेक्ट म्हणून मुंग्यांकडे पाहिले जात. मुंग्यांचे वारूळ हे वास्तुकलेचा नैसर्गिक चमत्कार आहे. मुंग्यांची विविध वारुळे वेगवेगळ्या प्रकारात असतात. वारुळात पाणी व्यवस्थापन, वातानुकूलित व्यवस्था पूल बोगदे देखील या वारुळात असतात अनेक मुंग्यांचा वापर किडनियंत्रणासाठी होतो. माती भुसभुशीत आणि कसदार करण्यासाठी मुंग्यां उपयोगी पडतात. पावसाळयात मुंग्या शक्यतो मातीच्या वारुळात राहत असतात. पाऊस ऊन विविध ऋतुंपासून संरक्षण करण्यासाठी मुंग्या वारुळे वेगवेगळ्या प्रकारात तयार करतात. नागपंचमीला मुंग्यांना खाद्य देणे ही परंपरा पूर्वजांपासून सुरू आहे.