- प्रवाशशांना सुरक्षित प्रवासाचे आवाहन
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या मार्गावर विनातिकीट आणि अवैधरित्या प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांविरोधातील कारवाईत गेल्या आर्थिक वर्षात रत्नागिरी विभागात 9 कोटी 4 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे तर संपूर्ण कोकण रेल्वेच्या मार्गावर गेल्या वर्षभरात अशा फुकट्या प्रवाशांकडून दंडापोटी 27 कोटी 58 लाख रुपयांचा दंड वसूल केला गेला आहे.
कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या विविध ट्रेनमधून अवैधरित्या आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना रोखण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने गेल्या वर्षभरात चालवलेल्या मोहिमेचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. अशा अवैध्यरित्या प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचा त्रास नियमित तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही होत असतो. यामुळे अशा प्रवाश्यांविरोधात कोकण रेल्वेने ठोस पाऊले उचलली.
गेल्या आर्थिक वर्षात रत्नागिरी विभागात विनातिकीट प्रवास करणाऱ्या 21,527 लोकांवर कारवाई करण्यात आली तर तर अवैध तिकिटासह रेल्वेत चढलेल्या 10741प्रवाशांवर कोकण रेल्वेने कारवाई करत या आर्थिक वर्षात 9 कोटी 4 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
गतवर्षी याच विभागातून 7 कोटी 74 लाख रुपयांचा दंड वसूल केला गेला होता.
कोकण रेल्वेने अशा प्रवाश्यांना पकडण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक केली असून हे पथक मार्गावर विविध ठिकाणी तिकीट तपासणीचे काम करत आहे.या पथकाने गेल्या वर्षभरात विविध गाड्यांमध्ये तपासणी करत 2204लोकांवर अवैध आणि विनातिकीट म्हणून कारवाई केली आहे.या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांनी प्रवाश्यांना नियमित तिकीट काढून सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.
अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करताना रेल्वेच्या पायऱ्यांवर बसून धोकादायकरित्या प्रवास करतात.यातून अनेक वेळा अपघात होऊन प्रवाश्यांना आपले प्राण गमवावे लागतात.त्यामुळे ट्रेनच्या पायऱ्यांवर बसून असुरक्षित प्रवास करू नये, असे आवाहन ही विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांनी केले आहे.
![]()
