महाराष्ट्र

रत्नागिरी तालुक्यात साकारले छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर!

महाराजांच्या जिल्ह्यातील पहिल्याच मंदिराचे शिर्केवाडी वाटद-मिरवणे येथे ना. उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी :  राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मंदीर उद्घाटन सोहळा शिर्केवाडी, वाटद-मिरवणे येथे मोठया उत्साहात संपन्न झाला.


यावेळी तहसिलदार रत्नागिरी शशिकांत जाधव, अध्यक्ष मराठा विकास मित्र मंडळ, पुणे हरिश्चंद्र सावंत, अध्यक्ष, वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळ नानासाहेब विचारे, अविनाश पाले, नारायण शिर्के, आबासाहेब सुर्वे, आदि मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिल्ह्यातील पहिल्याच मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे उद्घाटन आपल्या हस्ते होणे, हा आपल्या आयुष्यातील सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा हा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेकाला 350 वर्षे होत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांचे विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी 350 कोटींची तरतूद कालच सरकारने अर्थसंकल्पीय बजेटमध्ये केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी त्यांनी दिली. तसेच या मंदिराकडे जाणारा रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 10 लाख रुपये एवढा निधी आमदार निधी देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
श्री.सामंत म्हणाले, आपण पालकमंत्री झाल्यानंतर मारुती मंदीर येथे शिवसृष्टी साकारण्यात आली. ती बघण्यासाठी महाराष्ट्रातील लोक येथे येतात. रत्नदुर्ग किल्ल्याला ऐतिहासिक वारसा आहे. महाराष्ट्रातील सर्वात चांगली शिवसृष्टी रत्नदूर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी पुढच्या एक वर्षात होणार आहे. महाराष्ट्राची शान असेल,असा सर्वात मोठा जिजाऊंचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा रत्नागिरी येथे पुढील एक वर्षात होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शिवाजी महाराजांचे चरित्र सर्वांपर्यंत पोहचावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांवरचे सर्वात मोठे ग्रंथालय आणि संशोधन केंद्र हे रत्नागिरी येथे होत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.


छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपत असताना त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदीर प्रत्येक जिल्हयात होणे गरजेचे आहे आणि त्याची सुरुवात आपल्या जिल्हयातून झाली आहे. छत्रपतीं शिवाजी महाराजांचे विचार हा तळागळापर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button