मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात ‘सप्तरंग २०२६’ स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

चिपळूण, मांडकी पालवण, १७ मार्च २०२६ :
कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन ‘सप्तरंग २०२६’ मंगळवार, दिनांक १७ मार्च २०२६ रोजी अत्यंत उत्साहात पार पडले.
या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक श्री.संजय कळमकर उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. निखिल तानाजीराव चोरगे यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे मा.श्री. संजय कळमकर यांनी आपल्या खुसखुशीत शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी आभासी जगाचे वास्तव, सोशल मीडिया आणि आभासी जगाच्या अतिहारी न जाता वास्तव समजून घेण्याचे आवाहन केले.आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून आभासी जगात न वावरता प्रत्यक्षात सोबत असलेले जिवलग,निर्व्यसनी मित्र बनवून मैत्री निभावत प्रगती करावी. मोबाईलचा योग्य वापर प्रगतीसाठी करावा, ना की वेळेच्या अपव्ययासाठी, असा मोलाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी आयुष्यभर ‘विद्यार्थी’ राहून सतत नवीन ज्ञान घेण्याची वृत्ती जोपासावी, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे आणि त्यांच्यातील खिलाडूवृत्ती वाढवणे हा या स्नेहसंमेलनाचा मुख्य उद्देश होता. वर्षभरात शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या दिमाखदार सोहळ्याला कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, संचालिका मा. सौ. अंजलीताई तानाजीराव चोरगे, संचालक मा.श्री. सुरेशजी खापले, सचिव मा.श्री मिलिंद सुर्वे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे , उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी, तानाजीराव चोरगे कनिष्ठ शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सचिन तांबेकर यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि स्पर्धांमधील सहभागाने ‘सप्तरंग २०२६’ ची शोभा अधिकच वाढवली.





