चिपळूण : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने १४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत ३८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, ज्यामध्ये सुजल वाडकर, आदित्य तांबेकर, तुषार कांबळे, आर्या गायकवाड, अर्पिता आग्रे आणि सुविधा साळवी या सहा उत्कृष्ट विद्यार्थ्यांचे विशेष गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या प्रभावी भाषणांतून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर केला. तुषार कांबळे याने बाबासाहेबांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा इतिहास मांडला, तर वैभव पवळ याने आपल्या जोरदार भाषणात महापुरुषांना जातीत न विभागता त्यांचे विचार प्रत्यक्ष जीवनात अमलात आणण्याचे आवाहन केले. तसेच सरीता गिरी, साक्षी सावंत, आर्या गायकवाड, सिद्धी नेवसे, कृषीराज मोरे, ईशान डुंबरे आणि निरंजन बधडे यांनी आपल्या मनोगतातून संविधान रक्षणाचे महत्त्व पटवून देत , कृषी पदवीधरांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आणि बाबासाहेबांची शिकवण अखंड पुढे नेण्याचा निश्चय व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. संकेत कदम यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले आणि बाबासाहेबांची शिकवण आयुष्यभर जपण्याचे आवाहन केले. या प्रसंगी जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच उपप्राचार्य सूर्यवंशी सर, ज्येष्ठ प्राध्यापक दिवाळे सर, यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन कुमार अथर्व बर्गे याने केले, तर शेवटी कुमारी अमृता आंबेकर हिने सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
![]()
