दादरमधून गोरखपूर सोमवारपासून तर बलियाला मंगळवारपासून नियमित गाड्या ; दादर-रत्नागिरी पॅसेंजरचे घोडे मात्र अडलेलेच!

Team RatnagiriLive
4 Min Read
  • रत्नागिरीला पॅसेंजर सोडायला दादरला प्लॅटफॉर्म नाही तर गोरखपूर, बलियासाठी नियमित गाड्या कशा?

मुंबई : मध्य रेल्वेने १४ ऑगस्ट, २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार ०१०२७/०१०२८ दादर–गोरखपूर विशेष गाडीचे ११०४७/११०४८ दादर–गोरखपूर एक्स्प्रेस म्हणून आणि ०१०२५/०१०२६ दादर–बलिया विशेष गाडीचे ११०४३/११०४४ दादर–बलिया एक्स्प्रेस म्हणून नियमित गाड्यांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. दादर–बलिया एक्स्प्रेस १७ ऑगस्ट २०२६ पासून, तर दादर–गोरखपूर एक्स्प्रेस १८ ऑगस्ट २०२६ पासून नियमित धावणार आहे. असे असताना दीर्घकाळाची मागणी असलेली आणि सध्या दिव्यापर्यंत धावणारी रत्नागिरी पॅसेंजर मात्र पूर्वीप्रमाणे दादर येथून सोडण्याबाबत मध्य रेल्वे चालढकल करताना दिसत आहे.

मध्य रेल्वेच्या या निर्णयाचे स्वागत करताना महाराष्ट्रातील प्रवाशांच्या वतीने एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहे.

जर विशेष गाड्या नियमित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला मार्गाची क्षमता, वेळापत्रक, परिचालन व्यवहार्यता आणि इतर सर्व बाबींची पूर्तता करता येत असेल, तर महाराष्ट्रातील पूर्वीपासून सुरू असलेल्या आणि प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या गाड्या पुनर्स्थापित करण्यासाठी हीच तत्परता का दाखवली जात नाही?  असा सवाल उपस्थित होत आहे.

गेल्या काही वर्षांपासून ५०१०३/५०१०४ रत्नागिरी–दादर पॅसेंजर, ११०२३/११०२४ सह्याद्री एक्स्प्रेस, भुसावळ–मुंबई पॅसेंजर यांसारख्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या गाड्या बंद आहेत. विशेषतः रत्नागिरी–दादर पॅसेंजर ही १९९६-९७ पासून प्रवाशांच्या सेवेत असलेली आणि दादरमार्गे मुंबईच्या विविध भागांशी तसेच गुजरातशी जोडणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त सेवा होती.

कोकण विकास समिती २०२१ पासून रेल्वे प्रशासनाकडे अनेक निवेदने आणि पाठपुराव्यांच्या माध्यमातून या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. मार्च २०२३ मध्ये, तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री श्री. रावसाहेब दानवे यांनी आपल्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकीत प्रशासनाला या मागणीची तपासणी करून त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. या मुद्द्याला सर्वपक्षीय खासदार, आमदार आणि विधान परिषद सदस्यांकडूनही भक्कम आणि सातत्यपूर्ण पाठिंबा मिळाला असून, हा मुद्दा महाराष्ट्र विधानमंडळ आणि संसद या दोन्ही ठिकाणी उपस्थित करण्यात आला आहे. तथापि, एवढा व्यापक पाठिंबा असूनही, मध्य रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. 

केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी याबाबत व्यवहार्यता तपासणीचे आदेश दिलेल्याला ४ महिने उलटून गेल्यावरही अद्याप निर्णय झालेला नाही.

या गाड्या बंद ठेवताना मध्य रेल्वेकडून मार्गाची क्षमता, वक्तशीरपणा आणि  परिचालन अडचणी यांसारखी कारणे देण्यात आली. परंतु त्याच मार्गावर नवीन विशेष गाड्या सुरू करून त्यांचे आता नियमित गाड्यांमध्ये रूपांतर केले जात आहे. यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांमध्ये स्वाभाविकपणे असा प्रश्न निर्माण होत आहे की, नवीन गाड्यांसाठी उपलब्ध असलेली मार्गक्षमता जुन्या महाराष्ट्रातील गाड्यांसाठी उपलब्ध का नाही?

विशेषतः दादर–गोरखपूर आणि दादर–बलिया गाड्या ज्या दिवशी नियमित केल्या जात आहेत, त्याच दिवशी महाराष्ट्रातील बंद केलेल्या गाड्यांच्या पुनर्संचालनाची घोषणा केल्यास मध्य रेल्वे प्रशासन सर्व राज्ये, प्रदेश आणि प्रवासी वर्गांना समान वागणूक देते, असा स्पष्ट आणि सकारात्मक संदेश जाईल, असे रेल्वे अभ्यासकांचे मत आहे.

महाराष्ट्रातील प्रवासी जनतेच्या मागण्या

१. ५०१०३/५०१०४ रत्नागिरी–दादर पॅसेंजर पूर्वीप्रमाणे दादरपर्यंत तातडीने पुनर्संचालित करावी.
२. ११०२३/११०२४ मुंबई–कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस पूर्ववत सुरू करावी.
३. भुसावळ–मुंबई पॅसेंजर व इतर बंद करण्यात आलेल्या महाराष्ट्रांतर्गत प्रवासी/इंटरसिटी गाड्यांचेही पुनर्संचालन करावे.
. या गाड्यांना नवीन गाड्यांप्रमाणेच मार्गक्षमता आणि वेळापत्रकात योग्य प्राधान्य द्यावे.
५. महाराष्ट्रातील प्रवाशांमध्ये निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी १७ आणि १८ ऑगस्ट २०२६ रोजीच या गाड्यांच्या पुनर्संचालनाबाबत सकारात्मक निर्णय जाहीर करावा.

इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या गाड्यांना महाराष्ट्रातील प्रवाशांचा विरोध नाही. मात्र, महाराष्ट्रातील पूर्वापार चालत आलेल्या आणि प्रवाशांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणाऱ्या गाड्या बंद ठेवून त्याच मार्गावर नवीन आंतरराज्यीय गाड्या नियमित केल्या जात असल्याने निर्माण होणारी असमानतेची भावना दूर करणे ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे.

मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील प्रवाशांबाबत कोणताही भेदभाव नाही हे कृतीतून सिद्ध करण्याची ही योग्य संधी आहे. दादर–गोरखपूर आणि दादर–बलिया गाड्यांच्या नियमितीकरणासोबतच रत्नागिरी–दादर पॅसेंजर, सह्याद्री एक्स्प्रेस आणि इतर महाराष्ट्रातील बंद गाड्यांचे पुनर्संचालन करून प्रशासनाने सर्व प्रदेशांना समान न्याय दिल्याचा स्पष्ट संदेश द्यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील प्रवासी जनतेकडून केली जात आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment