मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत मंत्री नितेश राणेंचे कौतुक

Team RatnagiriLive
2 Min Read
  • वॉटर मेट्रोसाठी प्रभावी काम; ३४० किमी वॉटर मेट्रोमार्गांचे जाळे उभारणार


मुंबई : मुंबई आणि महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून उभारण्यात येत असलेल्या ‘मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी’मध्ये वॉटर मेट्रो हा गेमचेंजर ठरणार असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत प्रभावी आणि कौतुकास्पद काम केले आहे, अशा गौरवपूर्ण शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

विरोधकांच्या प्रस्तावाला उत्तर देत असताना मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या जलवाहतुकीचा आराखड्यावर भाष्य केले. ६ हजार ६६ कोटी रुपयांच्या या प्रस्तावात ३३ मार्ग आणि ४४ टर्मिनल्ससह तब्बल ३४० किलोमीटर लांबीचे वॉटर मेट्रोचे जाळे उभारण्यात येत असून, हे काम पूर्ण झाल्यावर ही जगातील सर्वात मोठी जलवाहतूक प्रणाली ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी सभागृहात व्यक्त केला.

मुंबईतील वाहतुकीचे एकात्मिकरण (मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी) करताना जलवाहतुकीला प्राधान्य दिले जात आहे. या संदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे यांच्या कामाचा विशेष उल्लेख केला. मुख्यमंत्री म्हणाले, “मुंबईच्या मल्टीमोडल कनेक्टिव्हिटीमध्ये आपण जी वॉटर मेट्रो तयार करतो आहोत, त्यामध्ये आमच्या नितेश राणेंनी खूप चांगल्या पद्धतीने आणि कौतुकास्पद काम केले आहे. या प्रकल्पांतर्गत २०३ पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वेसल्स (जलवाहने) खरेदी केली जाणार असून, २०३१ पर्यंत ७.५ कोटी प्रवासी याद्वारे प्रवास करतील, असे नियोजन करण्यात आले आहे. या महाकाय प्रकल्पाच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे काम युद्धपातळीवर सुरू असून वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) ‘पॉड टॅक्सी’ देखील सुरू करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment