सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनवर ‘या’ ३ महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मंजूर; रेल्वेमंत्र्यांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर (Sawantwadi Road Railway Station) प्रवाशांच्या सोयीसाठी तीन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास रेल्वे मंत्रालयाने अखेर मंजुरी दिली आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र पाठवून यासंदर्भात माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी २५ मार्च २०२६ रोजी पत्र लिहून सावंतवाडी रोड स्टेशनवर विविध गाड्या थांबवण्याची मागणी केली होती, ज्याला रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
‘या’ ३ रेल्वे गाड्यांना मिळाला सावंतवाडीत थांबा:
रेल्वे मंत्रालयाच्या मंजुरीनुसार आता खालील तीन गाड्या सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनवर थांबतील:
१. गाडी संख्या १२१३३/१२१३४: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – मंगळुरू एक्सप्रेस
२. गाडी संख्या १२४३१/१२४३२: तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस
३. गाडी संख्या १२२०१/१२२०२: लोकमान्य टिलक टर्मिनस (LTT) – तिरुवनंतपुरम उत्तर (कोच्चुवेली) गरीब रथ एक्सप्रेस
पर्यटन आणि प्रवाशांना मोठा फायदा
सावंतवाडी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी आणि पर्यटनाचे केंद्र आहे. या ठिकाणी राजधानी आणि गरीब रथ सारख्या महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळाल्यामुळे मुंबई, दिल्ली आणि केरळच्या दिशेने प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांना, चाकरमान्यांना आणि पर्यटकांना याचा मोठा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले असून, कोकणवासीयांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
