साखरपा गोरेवाडी येथे एसटी बसची उभ्या आयशर टेम्पोला जोरदार धडक; वाहकासह ९ जण जखमी

Team RatnagiriLive
2 Min Read

साखरपा (रत्नागिरी) : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर साखरपा येथील गोरेवाडी बस स्टॉपसमोर गुरुवारी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि आयशर टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला टायर पंक्चर झाल्यामुळे उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला मागून आलेल्या भरधाव एसटी बसने जोरदार धडक दिली. या अपघातात एसटी बसचा वाहक आणि आठ प्रवासी असे एकूण ९ जण जखमी झाले आहेत.

​नेमका अपघात कसा घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव-लांजा मार्गावर धावणारी एसटी बस (क्रमांक MH 14 MH 4835) लांजाच्या दिशेने प्रवास करत होती. ही बस साखरपा येथील गोरेवाडी स्टॉपजवळ आली असता, चालक जितेंद्र संभाजी पाटील (लांजा आगार) यांचे नियंत्रण सुटल्याने बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोच्या (क्रमांक MH 07 AJ 6558) मागील उजव्या बाजूला जोरदार धडक दिली. या धडकेत एसटी बसच्या डाव्या बाजूचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

​टायर पंक्चर झाल्याने टेम्पो होता उभा

आयशर टेम्पो चालक विलास रामचंद्र बोभाटे (रा. तोंडवली, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) हे माल घेऊन कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने निघाले होते. गोरेवाडी स्टॉपसमोर टेम्पोच्या पुढील डाव्या बाजूचा टायर पंक्चर झाल्याने त्यांनी वाहन सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला उभे केले होते. त्याच वेळी मागून येणाऱ्या एसटी बसने टेम्पोला धडक दिली.

​जखमींची नावे आणि पोलिसांची तत्परता

या अपघातात लांजा आगाराचे एसटी बस वाहक रोकडेश्वर पिराजी तोटेवाड (रा. लांजा) यांच्यासह बसमधील आठ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तसेच, क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक अवघ्या काही वेळातच सुरळीत केली. साखरपा पोलिसांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment