वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी

Team RatnagiriLive
1 Min Read
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मच्छीमार कुटुंबीयांची घेतली भेट; त्यांच्या समस्या जाणून घेत सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचा दिला विश्वास

मुंबई : राज्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीचा फटका शेतकऱ्यांसह मच्छीमार बांधवांनाही बसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी वर्सोवा कोळीवाड्याला भेट देत मच्छीमार बांधवांसोबत दिवाळी साजरी केली.

यावेळी मंत्री नितेश राणे यांनी वर्सोवा कोळीवाड्यातील मच्छीमार कुटुंबीयांची भेट घेतली. शकुंतला तोंबरी आणि विजय तुका यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. मच्छीमार बांधवांच्या दैनंदिन अडचणी, व्यवसायातील समस्या आणि सध्याच्या परिस्थितीमुळे त्यांच्या कुटुंबांवर निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी जाणून घेतल्या.

दिवाळीच्या निमित्ताने मच्छीमार कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण घालवत मंत्री नितेश राणे यांनी त्यांना दिवाळी फराळाचे वाटप केले. तसेच, राज्य सरकार मच्छीमार बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी दिला.

यावेळी मच्छीमार बांधवांनी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

संकटाच्या काळात मच्छीमार बांधवांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या पाठीशी शासन उभे असल्याचा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी दिला.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment