मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस अतिरिक्त रेकद्वारे पावसाळ्यात दररोज चालवावी

Team RatnagiriLive
2 Min Read
  • कोकण विकास समितीचे रेल्वेला पत्र

रत्नागिरी : मुंबई–मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस मान्सून वेळापत्रकानसार आठवड्यातील सहा दिवसांऐवजी तीनच दिवस चालवली जात असल्याने अतिरिक्त रेक उपलब्ध करून ही प्रीमियम गाडी एकतर आठवड्यातून सहा दिवस किंवा दररोज चालवावी, अशी मागणी कोकण विकास समितीने रेल्वेकडे केली आहे.

कोकण रेल्वे कडून राबविण्यात येणाऱ्या मान्सून वेळापत्रकात (15 जून ते 20 ऑक्टोबर) मुंबई–मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस (22229/22230) या लोकप्रिय जलदगती रेल्वेची सेवा आठवड्यातून सहा ऐवजी केवळ तीन दिवस होणार आहे. या निर्णयामुळे कोकण रेल्वेमार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात येणारी वंदे भारत एक्स्प्रेस ही 95% पेक्षा जास्त प्रवासी क्षमतेने नियमितपणे धावणारी सेवा असून, मुंबई–गोवा मार्गावरील प्रवाशांची पहिली पसंती ठरली आहे. मात्र, कोकण रेल्वेमार्गावरील पावसाळी अडचणी लक्षात घेता, या गाडीच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात येते.

लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव एक्स्प्रेसलाही फटका

11099/11100 लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव एक्स्प्रेसची फेरी देखील पावसाळ्यात चार दिवसांवरून दोन दिवसांवर आली आहे. त्यामुळे खेड, कणकवली, थिवीम यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवरील प्रवाशांसाठी पर्यायी गाड्यांची कमतरता भासू शकते.

कोकण विकास समितीकडून पाठपुरावा

या पार्श्वभूमीवर कोकण विकास समितीच्या जयवंत शंकर दरेकर आणि अक्षय महापदी यांनी मध्य रेल्वेकडे वंदे भारत एक्स्प्रेसची सेवा मान्सून कालावधीत दररोज सुरू ठेवावी. त्यासाठी एक अतिरिक्त रेक (रोलिंग स्टॉक) तैनात करून दादर–मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेससारखी विशेष मान्सून योजना राबवावी, अशी मागणी केली आहे.

या मागणीचा पाठपुरावा करताना त्यांनी रेल्वे मंत्र्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींचेही याकडे लक्ष वेधून घेतले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment