CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत ?

Team RatnagiriLive
3 Min Read
  • हा ‘शौर्याचा अपमान’ तात्काळ थांबवाच; छत्रपती शिवरायांचा पूर्ण इतिहास शिकवा ! – हिंदु जनजागृती समितीचे निवेदन


रत्नागिरी  : छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील तेजस्वी, राष्ट्रनिष्ठ आणि सार्वकालिक प्रेरणास्थान आहेत. अशा महापुरुषांचा इतिहास केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE च्या शाळांच्या) इयत्ता चौथी ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात केवळ ६८ शब्दांत आणि ११ ओळींत शिकवणे हे महाराजांच्या शौर्याचा, पराक्रमाचा आणि हिंदवी स्वराज्य संकल्पाचा अवमान आहे. असा अभ्यासक्रम महाराष्ट्रासाठी लागू करण्यापूर्वी, तसेच CBSE अभ्यासक्रमातही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास स्वतंत्र, सविस्तर आणि सन्मानपूर्वक समावेश तत्काळ करावा, अशा मागणीचे निवेदन आज हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी श्री. चंद्रकांत सूर्यवंशी यांना देण्यात आले.

यावेळी सर्वश्री शैलेश बेर्डे, ज्ञानेश्वर राऊत, निलेश आखाडे, सौ. सायली बेर्डे, मुकेश माळी, नितीन गांगण, गणपत निवळकर, गोविंद भारद्वाज, संजय जोशी आदी उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना निवेदन देताना हिंदुत्वनिष्ठ


CBSE च्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाचा समावेश करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री मा. दादा भुसे यांनी केली आहे. तसेच CBSE चा अभ्यासक्रम राज्यासाठी लागू करण्याविषयी त्यांनी म्हटले आहे. प्रत्यक्षात CBSE च्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया, राज्यकारभार, धर्मनिष्ठा, आरमार, गनिमी कावा आदींचा उल्लेखही नाही.
यापूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (NCERT) च्या इयत्ता ७ वीच्या ‘हमारे अतीत’ या पुस्तकांमध्ये केवळ ६ ओळींचा छत्रपती शिवरायाविषयी अवमानकारक इतिहास दिला होता. त्यालाही हिंदु जनजागृती समितीने तीव्र विरोध केल्यामुळे तो बदलावा लागला होता. गोवा सरकारलाही त्याच कारणास्तव इतिहासाचे पुस्तक मागे घेऊन स्वतंत्र नवीन प्रकरण समाविष्ट करावे लागले होते.
CBSE च्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना ग्रीस, रोम, चीन, अमेरिका आदी परदेशी राजवटी, सम्राट व युद्धांचा अभ्यास शिकवला जातो; मात्र स्वतःच्या देशातील महान राजाविषयी अपुरे आणि तुटक ज्ञान दिले जाते, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. जगभरातील विविध देशांच्या सैन्यदलांमध्ये अफझलखानवध, गनिमी कावा यांसारख्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला जातो, तर तोच इतिहास भारतात का शिकवला जात नाही, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. त्यामुळे बालभारतीच्या इयत्ता ४ थी व ७ वीच्या इतिहासपुस्तकांतील सुसंगत व सप्रमाण मजकुराचा अभ्यास करून CBSE च्या इतिहास अभ्यासक्रमात इयत्ता ६ वी ते १० वीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य, युद्धनीती, राज्यकारभार, धर्मनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा यांचा समावेश असलेला पूर्ण व तथ्याधारित अभ्यासक्रम तात्काळ तयार करावा, अशी मागणी समितीने केली आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment