पावसाळी बंदी काळातही अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या पाच बोटींवर कारवाई

Team RatnagiriLive
2 Min Read

उरण (विठ्ठल ममताबादे ) : कोकण समुद्र किनारी वसलेल्या उरण, रायगड, मुंबई समुद्र परिसरातील ठिकठिकाणी पावसाळी बंदी काळातही अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या  पाच मच्छीमार बोटी मागील सात दिवसात ताब्यात घेऊन काही बोटींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.


खोल समुद्रातील मासेमारीसाठी बंदीचे आदेश असतानाही आदेशाचे उल्लंघन करून उरण-मुंबई-रायगड समुद्र परिसरातील काही मच्छीमार नौका ठिकठिकाणी अवैधरित्या मासेमारी करीत असल्याचे आढळून आले आहे.मनुष्यबळ अपुरे असतानाही मत्स्य व्यवसाय विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांकडून बंदी काळात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बोटींवर कडक कारवाई केली जात आहे.

बंदी काळात एक ते ७ जुन दरम्यान मत्स्यव्यवसाय विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांनी अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या जय गौरी नंदन, एकवीरा माता,श्री जागृत गौराई, भवानी जगदंबा, देवाची आळंदी आदी पाच मच्छीमार बोटी ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई केली आहे.यापैकी एका बोटींकडून एक लाख ३० हजारांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.


देशाच्या सुरक्षेत सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे.त्यामुळे किमान सागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संयुक्त गस्त घालणाऱ्या कोस्टगार्ड, केंद्रीय सुरक्षा बल, सागरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बंदी काळातही अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बोटींची तपासणी करून कठोरपणे कारवाई करण्याची अपेक्षा आहे.संयुक्त गस्ती पथकाकडून पोलिस ठाण्यात नेऊन कारवाई दरम्यान सखोलपणे चौकशी केली जाऊ शकते.मात्र संयुक्त गस्ती पथक दुदैवाने याकामी पुढाकार घेताना दिसत नाही.उलट मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी कारवाई करीत नसल्याची ओरड करुन त्यांना वेठीस धरले जात आहे. असा गंभीर आरोप मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment