एअर इंडियाचे विमान कोसळताच हॉस्टेलच्या इमारतीमधून विद्यार्थ्यांच्या उड्या, नवा व्हिडीओ आला समोर!

Team RatnagiriLive
1 Min Read

अहमदाबाद : अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातामध्ये २७० हून अधिक लोकांचे प्राण गेले आहेत. विमानात बसलेल्या २४२ प्रवाशांपैकी २४१ प्रवासी मृत्यू पावले. तर विमान ज्याठिकाणी कोसळले तिथे ३० हून अधिक जणांचे मृत्यू झाल्याचे सांगितले जाते.

एअर इंडियाचे एआ-१७१ हे विमान मेघानी नगर भागातील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाला जाऊन आदळले होते. या वसतिगृहाच्या मागच्या बाजूस काही विद्यार्थी राहण्यास होते. इमारतीला आग लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी खिडकीतून उड्या घेतल्याचे व्हिडीओ आता समोर आले आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एमबीबीएसचे विद्यार्थी दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून उडी मारताना दिसत आहेत. त्यांनी बाल्कनीच्या खिडकीला चादरी बांधल्या असून त्याद्वारे ते खाली उतरताना दिसत आहेत.

इमारतीच्या पुढच्या भागाला विमानाची धडक बसल्यानंतर तिथे मोठे आगीचे लोळ दिसू लागले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली. विद्यार्थी आरडाओरडा करू लागले. यातच काही विद्यार्थ्यांनी बेडशीट बाल्कनीला बांधून त्याचा आधार घेत खाली उतरण्याचा प्रयत्न केला. तर काही विद्यार्थी रेलिंग पकडून खाली येण्याचा प्रयत्न करत होते.

१२ जून रोजी एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान ६२५ फूट उंचीवरून ४७५ फूट प्रति मिनिट वेगाने बीजे मेडिकल कॉलेजच्या कँटिनजवळ आदळले. यावेळी काही विद्यार्थी जेवण करण्यासाठी येथे आले होते. हे महाविद्यालय सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाहून काही किलोमीटर अंतरावर आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment