भूमिपुत्रांसाठी सुसज्ज हॉस्पिटल व भूमिपुत्र भवन उभारावे : गोपाळ पाटील

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण दि १८ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील स्थानिक भूमिपूत्र शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने संपादीत करून शासनाने अनेकांना भूमिहीन केले आहे. मात्र, या जमिनीवर मोठ्या प्रमाणात विकास होत असताना उरणच्या स्थानिक भूमिपुत्रांना आरोग्य व सामाजिक सुविधा अद्यापही मिळालेल्या नाहीत, त्यां मिळण्यासाठी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी सिडकोकडे मागणी केली आहे.

सन २००६ साली तत्कालीन आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या उपस्थितीत व भाजपा शिवसेना युतीच्या काळात उरणमध्ये एका सुसज्ज हॉस्पिटलसाठी सिडकोने निर्धारीत केलेल्या भूखंडावर भूमिपूजन करण्यात आले होते. त्या नंतर ४ ऑगस्ट २०२४ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेसुद्धा त्याच निर्धारीत भुखंडावर पुन्हा एकदा हॉस्पिटलचे भूमिपूजन पार पडले. परंतु आज १५ वर्ष उलटूनही त्या जागेवर एक विटही रचण्यात आलेली नाही, ही बाब अत्यंत दुःखद व निराशाजनक आहे. तरी सिडकोने हॉस्पिटलसाठी केलेल्या जागेवर स्वतः सिडको व्यवस्थापनाने आर्थिक तरतूद करून इमारत उभी करावी. तसेच आर्थिक तरतुदीसह भूमिपूत्र भवनासाठी जागा निश्चित करून भूमिपूत्र भवनसुद्धा उभे करावे व स्थानिक भूमिपुत्रांना काही अंशी न्याय द्यावा, अशी मागणी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी सिडकोकडे केली आहे.याबाबत त्यांनी विविध ठिकाणी पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुद्धा केला आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment