सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील पकडलेल्या सागरी माशांच्या जैवविविधतेचे मूल्यांकन व दस्तावेजीकरण” या विषयावर कार्यशाळा

Team RatnagiriLive
3 Min Read

रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे “सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील सागरी मत्स्य संपदेच्या जैवविविधतेचे मूल्यांकन व दस्तावेजीकरण” या विषयावर दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एन. पी. कांबळे, संशोधन प्रकल्प प्रमुख, संत राउळ महाराज महाविद्यालय, कुडाळ हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना करताना मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतनकुमार चौधरी यांनी प्रमुख सादरकर्ते शास्त्रज्ञ याची ओळख उपस्थितांना करून दिली व त्यांचे स्वागत केले.


यावेळी डॉ. एन. पी. कांबळे यांनी सिंधुदुर्ग जिल्हातील सागरी मस्त्य जैवविविधता यावर सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. तसेच मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन चे प्राध्यापक श्री सुशील कांबळे यांनी “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी मत्स्य उत्पादनाचे संख्यात्मक विश्लेषण” या विषयावर सादरीकरण केले, तर श्रीमती स्नेहल सावंत यांनी “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी मासळीचे वर्गीकरण” या विषयावर सादरीकरण केले. श्री कदम, संशोधन सहयोगी यांनी “वर्गीकरणातील समस्या” या विषयावर सादरीकरण केले.


या कार्यशाळेचा उद्देश संशोधन निष्कर्ष सादर करणे व सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील पकडलेल्या सागरी माशांच्या जैवविविधतेचे सर्वंकष मूल्यांकन व शास्त्रीय दस्तावेजीकरण या विषयावर शैक्षणिक चर्चा करणे हा होता. या सहयोगी चर्चेमुळे मौल्यवान शैक्षणिक अभिप्राय मिळून संशोधनाचे निष्कर्ष अधिक परिणामकारक ठरतील.


ही कार्यशाळा मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, संत राउळ महाराज महाविद्यालय, कुडाळ तसेच मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आली. कार्यक्रमा अंती मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतनकुमार चौधरी यांनी प्रमुख सादरकर्ते डॉ कांबळे सर, याचे सहयोगी श्रीमती स्नेहल सावंत आणि श्री कदम सर याचे आभार मानले.


या चर्चासत्रासाठी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव,श्री. निलेश मिरजकर,श्री. रोहित बुरटे,श्री. सुशील कांबळे,श्रीमती. मयुरी डोंगरे तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगांव, येथील डॉ ए. यु पागारकर, डॉ हरीश धमगाये, श्री नरेंद्र चोगले, श्रीमती वर्षा सदावर्ते, श्रीमती अपर्णा सावंत आणि मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी येथील प्राध्यापक डॉ अनिरुद्ध अडसूळ, डॉ विवेक निर्मळे, डॉ. संतोष मेतर त्याचप्रमाणे मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे तृतीय वर्षातील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेतील चर्चेअंती निष्कर्ष महाराष्ट्र जनुक प्रकल्पकडे सादर करण्यात येतील.
कार्यशाळेचे आयोजन मा. कुलगुरू डॉ संजय भावे सर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी आणि विद्यापीठ कृषी तंत्र शिक्षण विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ संतोष वरवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे करण्यात आले.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment