अंगणवाडीसाठी २६ जानेवारीनंतर २० हजार पदांची भरती

Team RatnagiriLive
2 Min Read

अंगणवाडी सेविकांसाठी १२ वी उत्तीर्ण असण्याची अट

मुंबई (सुरेश सप्रे) : राज्यातील १ लाख १० हजार अंगणवाड्यांमध्ये आता राज्य सरकारच्या माध्यमातून २० हजार पदांची भरती केली जाणार आहे.


केंद्र सरकारच्या पोषण आहार अंतर्गत आता भरतीसाठी १० वी नव्हे तर १२ वी उत्तीर्ण महिलांनाच संधी मिळणार आहे.
मदतनीस पदासाठी ७ वी असण्याची अट कायम राहणार आहे. २६ जानेवारी नंतर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. अंगणवाडी सेविका होण्यासाठी पूर्वीपासून १० वी उत्तीर्ण अशी अट होती परंतु अंगणवाड्यांमधील ७५ लाख विद्यार्थ्यांची दररोज पोषण ट्रॅकद्वारे माहिती भरताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

आता सेविकांच्या पदासाठी बारावी उत्तीर्ण असणे बंधनकारक असेल. त्यासंबंधीचा शासन निर्णय झाल्यानंतर भरती? प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ३० जानेवारी पूर्वी मदतनीस महिलांना शैक्षणिक पात्रतेनुसार सेविका पदी पदोन्नती दिली जाणार आहे.


त्यानंतर इतर पदांसाठी मात्र उमेदवारांकडून अर्ज मागणी, त्यांची यादी प्रसिद्ध करणे आणि त्यावर हरकती मागविण्यासाठी किंवा २० ते २५ दिवस लागणार आहेत. विधवा, जातसंवर्ग, पूर्वीचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता यावरून संबंधित पात्र उमेदवारांची थेट निवड केली जाणार आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अंगणवाड्यांमधील २० हजार पदांची भरती केली जाईल अशी माहिती एकात्मिक बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
१२ वी उत्तीर्ण महिला तरुणी सेविका म्हणून रुजू झाल्यास पोषण ट्रॅक वर माहिती सहजपणे भरतील. मुलांच्या शिक्षणाकडेही विशेष लक्ष राहील आणि कुपोषण कमी होण्यास मदत होईल हा शैक्षणिक पात्रता वाढीमागील हेतू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment