नाणीज (रत्नागिरी) ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा येथील चढावात बुधवार 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वा. सुमारास रसायन भरलेला ट्रेलर अचानक मागे येऊन उलटल्याने अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, मुंबई-गोवा महामार्ग तब्बल अडीच तास बंद राहिल्यामुळे वाहनांच्या भल्यामोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करुन दुपारी 1 वा. उलटलेला ट्रेलर बाजूला करुन महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

ट्रेलर चालक दशरथ मुनिराज बिंद (49, रा. मानखुर्द, मुंबई) हा बुधवारी सकाळी आपल्या ताब्यातील ट्रेलर (एमएच-43-बीपी-4646) वर आयसो टँक लोड करुन गोव्यातील कारखान्यातून रायगडमधील उरण येथील न्हावा शेवा बंदरात जात होता. सकाळी 10 वा. सुमारास ट्रेलर हातखंबा येथे चढावात आला असता ओव्हरलोड केमिकलमुळे तो चढावात मागे येऊ लागला. त्यामुळे दशरथचा ट्रेलरवरील ताबा सुटल्यामुळे ट्रेलर चढावात उलटून हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव आणि अग्निशमन दल, उप प्रादेशिक परिवहन महामंडळाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.
या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहतुक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेला ट्रेलर आणि ट्रेलर बाजूला करुन तब्बल अडीज तासांनी मुंबई-गोवा महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळित केली.
![]()
