Ratnagiri : शिवजयंतीनिमित्त रत्नागिरीत गुरुवारी भव्य पदयात्रा

Team RatnagiriLive
2 Min Read

रत्नागिरी  : छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखूवन दिलेले शौर्य, सुशासन आणि
राष्ट्र निर्माणाच्या आदर्शांशी युवकांना जोडणे या प्रमुख उद्देशाने शिवजयंती निमित्त गुरुवार दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते 8.30 वा. यावेळेत रत्नागिरी  (Ratnagiri) शहरातून भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पदयात्रा आयोजन करण्याबाबत आज बैठक झाली. या
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपजिल्हाधिकारी (सा.प्र) विश्वजीत गाताडे यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला उपजिल्हाधिकारी श्री. गाताडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती
निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या पदयात्रेबाबत माहिती दिली. पदयात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी
महाराज स्टेडीयम येथून होणार असून, जयस्तंभ मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम येथे या
पदयात्रेची सांगता होईल.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, या पदयात्रेमध्ये सर्व विभागांचे
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभागी होणे अनिवार्य असल्याबाबत त्यांना कळविण्यात यावे. पदयात्रेत सहभागी शालेय मुले, नागरिकांसाठी पाणी, अल्पोहार याची व्यवस्था करावी. पदयात्रेबरोबर एक आणि ज्या ठिकाणी पदयात्रा संपत आहे त्याठिकाणी एक अशा दोन रुग्णवाहिकांची सोय करावी. क्रीडा संघटना, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, एनसीसी, एनएसएस. स्काऊट गाईड, महाविद्यालयांचे विद्यार्थी विद्यार्थीनी यांचा पदयात्रेत सहभाग असावा, त्याबाबत नियोजन करावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित माहिती दर्शविणारे फलक असावेत. पदयात्रेदरम्यान वाहतूक अडथळा होणार नाही, यासाठी पोलीस ठेवण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment