चवदार तळ्याच्या आंदोलनातून समतेचा संदेश : हर्षवर्धन सपकाळ

Team RatnagiriLive
2 Min Read
  • आजचे सत्ताधीश खोटारडे  : उल्का महाजन
  • चवदार तळे सत्याग्रहाचा शताब्दी महोत्सव दणक्यात साजरा व्हायला हवा  : महेद्रशेठ घरत 

उरण दि २१ (विठ्ठल ममताबादे ) : चवदार तळ्याचा सत्याग्रह डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २० मार्च १९२७ रोजी झाला. अस्पृशांना सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी वापरण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी, सामाजिक समतेसाठी हा लढा झाला होता. त्या सत्याग्रह आंदोलनाचे यंदा शताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त महाड येथे चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्षे सोहळा शुक्रवारी (ता. २०) आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, उल्का महाजन, सिद्धार्थ हत्तीअंबीरे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “चवदार तळ्याच्या आंदोलनात बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अनेकांचा सहभाग होता. त्या आंदोलनातून समतेचा संदेश देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केले. तेव्हा समता, बंधुता, न्याय यांची खऱ्या अर्थाने पायाभरणी केली. महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी तोच वसा पुढे नेला. त्यातूनच पुढे संविधानाची निर्मिती झाली. आज सर्वधर्मसमभावाच्या विचारानेच काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. चवदार तळ्याच्या पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यातून माणसाने माणसाशी कसे वागावे, हा संदेश मिळतो.”

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन म्हणाल्या, “बाबासाहेब आंबेडकर हे सर्वधर्मीयांचे अनुयायी होते. आजचा काळ फार कठीण आहे. आजच्या सत्ताधीशांची सत्तेसाठी जी तंत्रे वापरली आहेत त्यात पोटात भूक आणि डोक्यात भीती, जातीभेद याचा अवलंब केला आहे. आजच्या सत्ताधीशांचा खोटे बोलण्यात कुणी हात धरू शकत नाही. ते प्रचंड भ्रष्टाचारी आहेत.” 

यावेळी तुषार गांधी म्हणाले, “महाडमधील ९९ वर्षांपूर्वीचा काळ अंगावर काटा आणणारा आहे. तो फक्त पाण्यासाठीचा लढा नव्हता, तर समतेचा विचार समाजात देण्याचा होता. त्यामुळे तो विचार रुजविण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे.”

यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेबांचे विचार तळागाळात रुजविणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी आपण कटिबद्ध होऊ या. चवदार तळ्याचा शताब्दी महोत्सव पुढच्या वर्षी भरगच्च व्हायला हवा. तो यशस्वी करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे.” यावेळी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment