- रेल्वेचा महाराष्ट्राला पुन्हा एकदा ‘दे धक्का’!
मुंबई: भारतीय रेल्वेच्या दुटप्पी धोरणामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे ‘लोकलचे वेळापत्रक बिघडते’ या सबबीखाली दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत करण्यास नकार देणाऱ्या रेल्वेने, आता मुंबई ते बेंगळुरू दरम्यान नवीन वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस (Vande Bharat Sleeper) सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. “खायचं महाराष्ट्राचं आणि गायचं परप्रांतीयांचं,” अशी टीका आता रेल्वे प्रशासनावर होत आहे.
नेमका वाद काय?
मुंबईतील लाखो कोकणवासीयांची जीवनवाहिनी असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर कोविड काळापासून दादर येथून बंद आहे. ही गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी सातत्याने होत असताना रेल्वे बोर्डाने तांत्रिक अडचणींचे कारण पुढे केले आहे. मात्र, त्याचवेळी मुंबईतून उत्तर प्रदेशातील गोरखपूर, बलिया आणि पुण्यातून बिहारसाठी नवीन गाड्यांचा धडाका लावला आहे. आता या यादीत बेंगळुरूसाठीच्या आलिशान वंदे भारत स्लीपरची भर पडली आहे.

बातमीतील महत्त्वाचे मुद्दे:
- वंदे भारत स्लीपरला मंजुरी: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार पी. सी. मोहन यांना पाठवलेल्या पत्राद्वारे KSR बेंगळुरू ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दरम्यान नवीन वंदे भारत स्लीपर गाडीला मंजुरी दिली आहे.
- कोकण रेल्वेकडे दुर्लक्ष: रत्नागिरी पॅसेंजरसाठी जागा नसल्याचे सांगणाऱ्या मध्य रेल्वेला परराज्यातील गाड्यांसाठी मात्र ट्रॅक मोकळे मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
- राजकीय नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष: नांदेड, कोल्हापूर यांसारख्या महाराष्ट्रातील शहरांना मुंबईशी जोडण्यासाठी रेल्वेकडे पुरेशी संसाधने नाहीत, मात्र बेंगळुरूसाठी तातडीने निर्णय घेतले जात असल्याने महाराष्ट्रातील नेत्यांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
प्रवाशांचा संताप
”रेल्वेला महाराष्ट्रातील अंतर्गत प्रवाशांच्या सोयीपेक्षा परराज्यातील कनेक्टिव्हिटीमध्ये जास्त रस आहे का?” असा सवाल प्रवासी संघटना विचारत आहेत. मुंबईत कमवायचे आणि सुविधा मात्र परप्रांतीयांच्या सोयीनुसार द्यायच्या, हे धोरण महाराष्ट्राचा अपमान करणारे असल्याची भावना सर्वसामान्य मुंबईकरांमध्ये आहे.
