संगमेश्वर: संगमेश्वरजवळील कोंड उमरे येथे शास्त्री नदीच्या डोहात बुडून आंघोळीसाठी गेलेल्या ५० वर्षीय काका आणि ९ वर्षीय पुतणीचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
रमेश कांबळे (५०) आणि स्वरा संतोष कांबळे (९, रा. कोंड उमरे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी) अशी मृत काका-पुतणीची नावे आहेत.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, ९ वर्षीय स्वराने नदीवर आंघोळ करण्याचा हट्ट धरला होता. त्यामुळे काका रमेश कांबळे यांनी तिला आंघोळीसाठी शास्त्री नदीवर नेले. नदीच्या डोहात आंघोळ करत असताना अचानक स्वरा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागली. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात रमेश कांबळे यांचाही बुडून मृत्यू झाला.
सायंकाळी या दोघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगताना ग्रामस्थांना आढळले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एका चिमुकलीचा आणि तिच्या काकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संगमेश्वर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
