कोकण रेल्वेच्या प्रवाशांचे प्रश्न सुटणार?

Team RatnagiriLive
2 Min Read
  • कोकण विकास समितीकडून खासदार सुनील तटकरेंना ९ मागण्यांचे निवेदन!

रत्नागिरी / महाड : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि प्रलंबित मागण्यांबाबत कोकण विकास समितीने रविवारी (२१ जून २०२६) रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान प्रवाशांच्या रेल्वे प्रवासातील अडचणी तातडीने सोडवण्यासाठी समितीच्या वतीने एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

समितीच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत, खासदार तटकरे यांनी रेल्वे मंत्री, रेल्वे बोर्ड, मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे प्रशासनाकडे या विषयांचा तत्काळ पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.

निवेदनातील ९ प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:

​१. रत्नागिरी-दादर पॅसेंजर पूर्ववत सुरू करणे अथवा मुंबई आणि रत्नागिरी दरम्यान नवीन गाडी सुरू करणे.

२. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला ८ ऐवजी २० डब्यांचा रेक उपलब्ध करून देणे.

३. मुंबई आणि चिपळूण दरम्यान नवीन रेल्वे गाडी सुरू करणे.

४. महाड तालुक्यातील करंजाडी रेल्वे स्थानकावर काही महत्त्वाच्या गाड्यांना थांबे देणे.

५. मडगाव-वांद्रे एक्सप्रेस ही गाडी आठवड्यातून काही दिवस चालवण्याऐवजी दैनिक (Daily) करणे.

६. आगामी गणपती उत्सव विशेष गाड्यांच्या (Ganpati Special Trains) नियोजनाबाबत चर्चा करणे.

७. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत (Indian Railways) विलिनीकरण करणे व संपूर्ण मार्गाचे तातडीने दुहेरीकरण (Doubling) करणे.

८. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी भाड्यावर आकारण्यात येणारा ४०% अतिरिक्त अधिभार (Surcharge) रद्द करणे.

९. खेड तालुक्यातील दिवाणखवटी स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उंच फलाट (High-level Platform) बांधणे.

“रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सेवा सुधारणा आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोकण विकास समिती सातत्याने प्रयत्नशील राहील,” असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

​यावेळी कोकण विकास समितीचे अक्षय मधुकर महापदी, विजय महादेव मोरे, प्रशांत रामचंद्र दरेकर आणि जयवंत शंकरराव दरेकर उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment