लोटे एमआयडीसीतील सीईटीपी प्लांट एमआयडीसीने ताब्यात घ्यावा

Team RatnagiriLive
1 Min Read
  • उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

रत्नागिरी : खेड तालुक्यातील लोटे परशुराम एमआयडीसीतील कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (सीईटीपी) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) ताब्यात घ्यावा, अशी मागणी आमदार प्रमोद जठार यांनी उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडे केली आहे. या मागणीची दखल घेत उद्योगमंत्री डॉ.सामंत यांनी एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती वैभव खेडेकर यांनी दिली.

आमदार प्रमोद जठार यांनी दिलेल्या निवेदनात, सध्या सहकारी संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या सीईटीपी प्रकल्पाच्या व्यवस्थापनात सांडपाणी प्रक्रिया, यंत्रसामग्रीची देखभाल व प्रदूषण नियंत्रणाबाबत अपेक्षित दक्षता घेतली जात नसल्याच्या तक्रारी असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे पर्यावरणीय निकषांचे पालन, जलस्रोतांचे संरक्षण आणि नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एमआयडीसीकडे आवश्यक तांत्रिक क्षमता, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सक्षम प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध असल्याने हा प्रकल्प त्यांच्या ताब्यात दिल्यास संचालन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार होईल, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांनी या मागणीची गंभीर दखल घेत संबंधित प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिल्याने लोटे-परशुराम एमआयडीसीतील सीईटीपी प्रकल्पाच्या व्यवस्थापनाबाबत लवकरच महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment