यशस्वी कोळंबी शेतकरी श्रद्धा अनगोळकर यांचा सत्कार

Team RatnagiriLive
2 Min Read
  • इनरव्हील क्लबतर्फे राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा

रत्नागिरी : दरवर्षी 10 जुलै रोजी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा केला जातो. इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन तर्फे पटवर्धन हायस्कूल येथे “मत्स्य शेतीतील रोजगार संधी” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.

मार्गदर्शन शिबिरात मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्रा. डॉ सुशील कांबळे यांनी मत्स्य शेतीतील रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले . श्री प्रतीक यादव यांनी कोळंबी संवर्धनातील रोजगाराच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले. रत्नागिरी जिल्ह्यातील यशस्वी कोळंबी संवर्धक आणि मत्स्य अभियांत्रिकी पदविकाधारक श्रीमती श्रद्धा अनगोळकर कुलकर्णी यांचा शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. श्रीमती श्रद्धा यांनी राजापूर, दापोली तालुक्यात कोळंबी शेती फार्म तयार केलेले असून त्या यशस्वीपणे कोळंबी शेती करत आहेत . त्यांनी स्वरोजगार निर्माण केला असून इतरांना सुद्धा रोजगाराची संधी निर्माण केली आहे. वर्षातून दोन वेळेला निर्यातक्षम कोळंबीचे पीक घेतले जाते.

इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन च्या अध्यक्षा सौ सुवर्णा चौधरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,नैसर्गिक जल स्त्रोतातील मत्स्य साठा प्रदूषण, अनियंत्रित मासेमारी यामुळे हळूहळू कमी होत आहे, त्यामुळे मत्स्य शेती करून मत्स्य उत्पादन वाढविणे शक्य आहे. मत्स्य व्यवसायामध्ये रोजगार आणि स्वयंरोजगारातून संधी उपलब्ध असून तरुण/विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन त्यात स्वतःचे करीअर करू शकतात. शासनातर्फे विविध योजना उपलब्ध असून त्याचा फायदा घ्यावा.

यावेळी इनर व्हील क्लबच्या माजी अध्यक्षा ऋचा गांधी, श्रद्धा सावंत, डाॅ. प्रियांका कांबळे, आशा सनगर, अपूर्वा सुर्वे, अनुश्री सावंत उपस्थित होत्या. पटवर्धन हायस्कूल च्या मुख्याध्यापिका घाटविलकर मॅडम यांचे सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. मुलांसाठी
करियर मार्गदर्शन शिबिर आयोजित केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment