- ‘श्री रत्नागिरीचा राजा’ आगमन मिरवणुकीत शिवानी धोपावकर दाखवणार कसरती
- श्री रत्नागिरी चा राजा आगमन मिरवणुकीच्या निमित्ताने रत्नागिरीकरांना पर्वणी
रत्नागिरी : रत्नागिरीतील गणेशोत्सव प्रेमींसाठी आणि कलासक्तांसाठी यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत खास ठरणार आहे. ‘श्री रत्नागिरीचा राजा’ या सार्वजनिक गणेशोत्सवातील बाप्पाच्या आगमन मिरवणुकीनिमित्त ३० ऑगस्ट २०२६ रोजी रत्नागिरीकरांना पहिल्यांदाच ‘हूलाहूप नृत्याच्या’ (Hula Hoop Dance) अद्भुत कसरती प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहेत. प्रसिद्ध हूलाहूप कलाकार शिवानी धोपावकर (द बॉम्बे हूपर) ही आपल्या अनोख्या कलेचे सादरीकरण बाप्पाच्या आगमन सोहळ्यात करणार आहे.
भारतीय संस्कृती आणि कलेचा अनोखा संगम
शिवानी धोपावकर हिने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरही आपल्या हूलाहूप नृत्याचे अनेक यशस्वी कार्यक्रम केले आहेत. वेस्टर्न प्रकार मानल्या जाणाऱ्या हूलाहूप कलेला भारतीय संस्कृतीचा आदर राखून आणि पारंपरिक वेशभूषेत सादर करणे हे शिवानीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात ती हुप्सवर अत्यंत आकर्षक आणि थरारक कसरती सादर करणार आहे.
रत्नागिरीकरांसाठी पहिलीच संधी
‘श्री रत्नागिरीचा राजा’ गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बाप्पाच्या आगमनानिमित्त या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारची हूलाहूप नृत्याची कसरत रत्नागिरीत प्रथमच आयोजित केली जात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आणि तरुणाईमध्ये या सोहळ्याबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या या भव्य आगमन मिरवणुकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
