गावखडीतील कांदळवन सफर आणि कासव संवर्धनाचा जागर

Team RatnagiriLive
2 Min Read

रत्नागिरी : कोकणातील निसर्गसंपदा, जैवविविधता आणि स्थानिक पर्यटनाची वैशिष्ट्ये उलगडून दाखवणाऱ्या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या ‘कोकण दर्शन’ या कार्यक्रमात यावेळी गावखडी गाव, कांदळवन सफर आणि कासव संवर्धन या विषयांचा वेध घेतला जाणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला समुद्रकिनारा, खाड्या, कांदळवने आणि त्यावर अवलंबून असलेली समृद्ध जैवविविधता ही कोकणची वैशिष्ट्ये आहेत. गावखडी परिसरातील निसर्गसौंदर्याबरोबरच कांदळवनांचे पर्यावरणीय महत्त्व, कांदळवन सफरीतून अनुभवता येणारे निसर्गवैभव आणि स्थानिक पातळीवर पर्यटनाच्या उपलब्ध होणाऱ्या संधी याविषयी या कार्यक्रमातून माहिती दिली जाणार आहे.

समुद्रकिनाऱ्यावरील कासवांचे संवर्धन हीदेखील कोकणच्या पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. कासवांच्या प्रजननाचा काळ, त्यांचे अधिवास, पिल्लांचे समुद्राकडे जाण्याचे थरारक चक्र तसेच कासव संवर्धनासाठी स्थानिक नागरिक आणि कासवमित्रांकडून केले जाणारे प्रयत्न याबाबतही कार्यक्रमात सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

या कार्यक्रमात डॉक्टर गजानन रानडे, स्थानिक व्यावसायिक निनाद पाटील आणि कासव मित्र प्रदीप डिंगणकर सहभागी होणार आहेत. त्यांच्या अनुभवातून गावखडी परिसरातील निसर्ग, कांदळवन सफर आणि कासव संवर्धनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला जाणार आहे.

‘कोकण दर्शन’ हा कार्यक्रम शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ८.४० वाजता आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित होणार आहे. कार्यक्रमाचे लेखन सोनाली सावंत यांनी केले असून निवेदन आणि निर्मिती सहाय्य वंदना मुसळे आणि सोनाली सावंत यांचे आहे. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे आहेत.

हा कार्यक्रम ११४३ KHz, १०१.५ MHz, तसेच Newsonair मोबाईल ॲप आणि YouTube – airratnagiri वर ऐकता येणार आहे. आकाशवाणी रत्नागिरीच्या Facebook आणि Instagram – @airratnagiri या समाजमाध्यमांवरही केंद्राशी संबंधित माहिती उपलब्ध आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment