वंदे भारत एक्सप्रेस चाचणीसाठी कोकण रेल्वे मार्गावर मार्गावर दाखल!

Team RatnagiriLive
2 Min Read

रत्नागिरी : देशभरात जवळपास 14 मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस धाऊ लागलेली असताना देशातील पहिली तेजस एक्सप्रेस धावलेल्या कोकण रेल्वे मार्गावर ती नेमकी कधी सुरू होणार याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुंबईतून चाचणीसाठी निघालेली वंदे भारत एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर दाखल झाली आहे.

मुंबई ते मडगाव दरम्यान चाचणीसाठी निघालेल्या आणि कोकण रेल्वे मार्गावर पहिल्यांदाच येणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे रसायनी स्थानकावर टिपलेले छायाचित्र.

वंदे भारत एक्सप्रेसची ‘ट्रायल रन’ कोकण रेल्वे मार्गावर आज मंगळवारी सुरू झाली आहे. ट्रायल रन साठी मुंबईतील सीएसएमटी जंक्शन येथून निघालेली वंदे भारत एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर दाखल देखील झाली आहे आहे. दरम्यान, चाचणी दौड यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई सीएसएमटी ते मडगाव मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे सध्याची तेजस एक्सप्रेस बंद होते की, वेळापत्रक बदलून सुरूच ठेवले जाते याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे.

आतापर्यंत ज्या ज्या मार्गानंवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे त्या ठिकाणी आधीची कोणतीही ट्रेन बंद न करता सुरू झाली आहे. हा इतिहास पाहता कोकण रेल्वे मार्गावर नव्याने सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे तेजस व अन्य कोणतीही गाडी बंद केली जाणार नसल्याचे समजते आहे.

दरम्यान, दुपारी अडीच वाजता चाचणीसाठी धावलेली वंदे भारत एक्सप्रेस गोव्यात मडगाव जंक्शनला पोहोचल्यानंतर तिथून तिचा परतीचा प्रवास सुरू होऊन रात्री अकरा वाजता ती मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस च्या कोकण रेल्वे मार्गावरील चाचणी दरम्यान रूट ट्रायल तसेच स्पीड ट्रायल या दोन प्रकारच्या चाचण्या होणे अपेक्षित आहेत. या चाचणीसाठी आजच्या प्रमाणेच अजूनही चाचणी फेरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई पासून वीर पर्यंत वंदे भारत एक्सप्रेससाठी दुहेरी मार्ग असल्यामुळे वीर पर्यंत दोन्ही मार्गांवर रोड ट्रायल होईल, असे अपेक्षित आहे.

ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर येथे काही दिवसातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसच्या सेवेचे लोकार्पण करतील, अशी सूत्रांची माहिती आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment